शेलवलीच्या खंडोबाची आज यात्रा
By Admin | Updated: February 2, 2015 22:57 IST2015-02-02T22:57:18+5:302015-02-02T22:57:18+5:30
शहापूर तालुक्यातील खंडोबाची शेलवली येथील एक दिवसाच्या खंडोबाच्या यात्रेसाठी तालुक्यातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.

शेलवलीच्या खंडोबाची आज यात्रा
शहापूर : शहापूर तालुक्यातील खंडोबाची शेलवली येथील एक दिवसाच्या खंडोबाच्या यात्रेसाठी तालुक्यातील भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. नवसाला पावणारा खंडोबा म्हणून प्रचिती येत असल्याने येथे भाविक दूरवरून येतात. यंदा ही यात्रा उद्या (मंगळवार) भरणार आहे.
शहापूरपासून दीड किमी अंतरावर खंडोबाची शेलवली म्हणून प्रसिद्धीस आलेले गाव असून या गावात रिक्षा, जीप किंवा बसने जाता येते. रस्त्याच्या कडेला गाव असून बाजूला डोंगरमाथ्यावर वसलेले खंडोबाचे मंदिर. या मंदिराविषयी गावातील जुने जाणकार आख्यायिका सांगतात. १८६४ पासून या डोंगरावर शंकराची स्वयंभू पिंड आहे. कौलारू मंदिरात पूजाअर्चा नित्यनेमाने होते. याच मंदिराच्या पूजाअर्चेबरोबर उत्सवासाठी फिरत्या पोलीस-पाटीलकीनुसार पाच एकर जागा खंडोबाच्या नावावर आहे. त्याच उत्पन्नात गावकरी मोठ्या भक्तिभावाने भर घालून ही यात्रा पार पाडतात. माघ शु. पौर्णिमेला उत्साहात उत्सव पार पाडण्याची प्रथा आजही कायम आहे.
या मंदिरात खंडोबा, म्हाळसा, बानू, योगिनी, अन्नपूर्णा यांच्या मूर्ती आढळतात. या मंदिरात पूर्वी दरोडेखोरांनी येऊन खंडोबाला कौल मागितला, मात्र हा कौल न मिळाल्याने रागात येऊन त्यांनी योगिनी व अन्नपूर्णा मूर्तींचे हातपाय तोडले. ते पळून जात असताना त्या सातही दरोडेखोरांना मूर्च्छा आली. नाकातोंडातून रक्त आले. मरताना या दरोडेखोरांच्या म्होरक्याने मणी महंत्नकाने आपणास आपल्याच पायाजवळ जागा देण्याचे व नैवेद्य देण्याचे मागणे मागून ते पूर्णत्वास आणले. ही वार्ता रात्री गावातील एका व्यक्तीच्या अंगात येऊन तिने कथन केली, अशी दंतकथा आहे़ आज या मंदिरात जाताना ज्या सात पायऱ्या आहेत, त्या त्याचीच साक्ष देत आहेत. पुढे नवस न फेडणाऱ्यांच्या कड्या तुटण्याचीही अशीच कथा आहे. एकंदरीत नवसाला पावणारा हा खंडोबा असून गावाचा पालनकर्ता म्हणून याकडे पाहिले जाते. मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे मंदिरासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून अनेक उपाययोजना येथे करण्यात येणार आहेत. (वार्ताहर)