‘लोकमत’ छायाचित्र प्रदर्शनाचे आज उद्घाटन
By Admin | Updated: August 19, 2014 00:43 IST2014-08-19T00:42:41+5:302014-08-19T00:43:12+5:30
शाहू स्मारकमध्ये प्रारंभ : ‘कोल्हापुरी कला’ उलगडणार; दोन दिवस चालणार प्रदर्शन

‘लोकमत’ छायाचित्र प्रदर्शनाचे आज उद्घाटन
कोेल्हापूर : कोल्हापूरचे अलौकिक सौंदर्य टिपण्यासाठी ‘लोकमत उमंग’अंतर्गत घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेतील निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या, मंगळवारी शाहू स्मारक कलादालनात सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ कला समीक्षक श्रीराम खाडीलकर यांच्या हस्ते होत आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्ग, पक्षी, प्राणी वैभव, निसर्गस्थळे, पर्यटनस्थळांचे सौंदर्य कोल्हापूरकरांना डोळे भरून पाहता येणार आहेत. जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त ‘लोकमत’ने हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी स्पर्धा घेतली. त्यात चंदगड, राधानगरीपासून हातकणंगलेपर्यंतच्या दीडशे छायाचित्रकारांनी सहभाग घेतला आहे. त्यातील उत्कृष्ट छायाचित्रांना बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या प्रदर्शनात मांडलेली छायाचित्रे विकून जमा होणारा निधी ‘स्वयंम’ मतिमंद मुलांच्या शाळेसाठी दिला जाणार आहे. म्हणजे तुम्ही कलेच्या आवडीपोटी विकत घेतलेले एक छायाचित्र तुम्हास एका वेगळ््या संवेदनशील सामाजिक कामांची अनुभूती देणार आहे.
‘लोकमत’चा वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा बुधवारी (दि. २०) धैर्यप्रसाद हॉलमध्ये होणार आहे. त्यानिमित्त सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत पानसुपारी व भेटीगाठी सोहळ्याचे आयोजन केले आहे. ‘लोकमत’चे यंदा दशकपूर्ती वर्ष आहे. त्यानिमित्त कोल्हापुरी कलेचा इतिहास, वर्तमान व भविष्य मांडणारा दर्जेदार खास विशेषांक ‘कोल्हापुरी कला’ या नावाने प्रसिद्ध करण्यात येत आहे. वाचकांना तो उद्या, मंगळवारपासूनच तीन दिवस दिला जाणार आहे. बुधवारी ‘लोकमत’च्या लक्ष्मीपुरीतील शहर कार्यालयात सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होईल. या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे हजर राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
प्रदर्शनाची वेळ
मंगळवार व बुधवार
सकाळी १० ते रात्री ८
स्थळ : शाहू स्मारकमधील कलादालन