२१ नगरसेवकांचे भवितव्य आज मतपेटीत
By Admin | Updated: October 15, 2014 04:54 IST2014-10-15T04:54:42+5:302014-10-15T04:54:42+5:30
नगरसेवक ही पहिली राजकीय पायरी चढल्यानंतर आमदारकीचे वेध लागण्यास वेळ लागत नाही़ मात्र पक्षातील स्थान व राजकीय वजनानुसारच काहींना ही संधी मिळत असते़

२१ नगरसेवकांचे भवितव्य आज मतपेटीत
मुंबई : नगरसेवक ही पहिली राजकीय पायरी चढल्यानंतर आमदारकीचे वेध लागण्यास वेळ लागत नाही़ मात्र पक्षातील स्थान व राजकीय वजनानुसारच काहींना ही संधी मिळत असते़ परंतु या वेळेस शिवसेना आणि भाजपा तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फाटाफुटीमुळे वजनदार उमेदवारांची टंचाई सर्वच राजकीय पक्षांना भासू लागली़ त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा दुप्पट नगरसेवकांना मंत्रालयात जाण्याची संधी चालून आली आहे़ या २१ जणांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंदिस्त होणार आहे़
२००९ विधानसभा निवडणुकीत नऊ नगरसेवकांना आमदारकीची तिकीट मिळाली होती़ मात्र या वर्षी मित्रपक्षच बरोबर नसल्यामुळे उमेदवारीसाठी सर्वच पक्षांनी नगरसेवकांना प्राधान्य दिलेले आहे़ भाजपाने ३२ नगरसेवकांपैकी तब्बल सात जणांना उमेदवारी दिली आहे़ तर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांनीही काही महत्त्वाच्या मतदारसंघातून नगरसेवकांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे़ मित्रपक्षाविना पहिल्यांदाच लढण्यात येणाऱ्या निवडणुकीत कोणाला यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)