‘लोकमत’चा आज दशकपूर्ती वर्धापनदिन सोहळा
By Admin | Updated: August 20, 2014 01:23 IST2014-08-20T01:23:19+5:302014-08-20T01:23:42+5:30
सायंकाळी पानसुपारी : ‘कोल्हापुरी कला’ विशेषांकाचे उत्स्फूर्त स्वागत

‘लोकमत’चा आज दशकपूर्ती वर्धापनदिन सोहळा
कोेल्हापूर : गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक घटना, घडामोडींचा साक्षीदार असलेल्या व जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत जागल्याची भूमिका बजावणाऱ्या ‘लोकमत’चा उद्या, बुधवारी दशकपूर्ती वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे.
वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा उद्या, बुधवारी ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉलमध्ये होणार आहे. त्यानिमित्त सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत पानसुपारी व भेटीगाठी सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्याचे दीपप्रज्वलन करून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरी कलेचा इतिहास, वर्तमान व भविष्य मांडणारा दर्जेदार खास विशेषांक ‘कोल्हापुरी कला’ या नावाने प्रसिद्ध करण्यात येत आहे. वाचकांच्या भेटीला तो मंगळवारपासूनच आला आहे. उद्या सकाळी दहा वाजता करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीला ‘लोकमत’चा हा विशेषांक अर्पण करण्यात येईल. त्यानंतर ‘लोकमत’च्या लक्ष्मीपुरीतील शहर कार्यालयात सकाळी साडेअकरा वाजता ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या हस्ते खास अंकाचे प्रकाशन होईल. वर्धापनदिनानिमित्त सामाजिक बांधीलकी म्हणून ‘लोकमत’तर्फे शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील
विद्यार्थी विकास प्रबोधिनी संस्थेच्या अनाथाश्रमास सकाळी नऊ वाजता
धान्य व मिठाईचे वाटप केले जाणारआहे. या सर्व कार्यक्रमांना लोकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे हजर राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
संग्राह्य विशेषांक..
वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या ‘लोकमत’च्या विशेषांकास वाचकांकडून नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो. यापूर्वी ‘सह्याद्रीचा वारसा’ या विशेषांकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. गेल्या वर्षीच्या ‘कोल्हापुरी राजकारण’ या विशेषांकाचेही पुस्तक तयार आहे. यंदाचा विशेषांकही त्याच गुणवत्तेचा आहे. त्यातील पहिली पुरवणी मंगळवारी प्रसिद्ध होताच वाचकांनी तिचे भरभरून स्वागत केले. कोल्हापुरातील पुतळ््यांची एकत्रित माहिती वाचून यंदाही ‘लोकमत’ने या विशेषांकाचे पुस्तक प्रसिद्ध करावे, अशी आग्रही सूचना केली.