लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनिअरिंग प्रवेशाच्या कॅप फेरीला अर्ज करण्याची मुदत १४ जुलै रोजी संपणार आहे. विद्यार्थ्यांना त्यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणी करता येणार असून त्यानंतर १५ जुलैपर्यंत अर्जांची ऑनलाइन पडताळणी करावी लागणार आहे. प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी २४ जुलैला जाहीर केली जाणार आहे.
सीईटी सेलने इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेश प्रक्रियेला २८ जूनपासून सुरुवात केली. त्याची मुदत मंगळवारी ८ जुलैला संपुष्टात आली. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण भरणे बाकी असल्याने काही उमेदवार, पालक तसेच शैक्षणिक संस्थांनी नोंदणीसाठी काही दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बीई या अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. सीईटी सेलने एमबीए अभ्यासक्रमाच्या नोंदणीची मुदतही १४ जुलैपर्यंत असून २४ जुलैला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
‘वर्किंग प्रोफेशनल’साठी एमई, एमटेक प्रवेशप्रक्रिया सुरू
वर्किंग प्रोफेशनलसाठीच्या एम.ई आणि एम. टेक अभ्यासक्रमाची कॅप प्रवेशप्रक्रियाही सीईटी सेलने सुरू केली असून, विद्यार्थ्यांना १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. नोंदणीकृत उद्योग-व्यवसाय, तसेच खासगी, सरकारी अथवा एमएसएमईमधील कर्मचारी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. त्याचे वर्गही सायंकाळी अथवा विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार भरविले जातात. या अभ्यासक्रमाची कॅप प्रवेशप्रक्रिया दि. ११ जुलैपासून सुरू झाली आहे. तर २५ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
बीएड, बीपीएड कॅप फेरीची नोंदणी आता १८ जुलैपर्यंत
सीईटी सेलने बी. एड., बीपीएड आणि एमपीएड प्रवेशाच्या कॅप फेरीला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना आता या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. सीईटी सेलने बीएड अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेश प्रक्रियेला २५ जूनपासून सुरुवात केली होती. त्याची मुदत १० जुलैला संपुष्टात आली. तसेच ३ जुलैला सुरू झालेल्या बीपीएड आणि एमपीएडच्या नोंदणीची मुदत १३ जुलैला संपली. मात्र त्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण भरणे बाकी असल्याने नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.