Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना न्याय मिळत नाही, त्यांना आम्ही देतो; संग्राम थोपटेंच्या पत्रावरुन फडणवीसांचं सूचक विधान

By मुकेश चव्हाण | Updated: August 3, 2023 16:12 IST

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं

मुंबई: अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील समीकरणे बदलली. उपमुख्यमंत्रीपदी  अजित पवार  विराजमान झाले. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीसांनीकाँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्रावरुन सभागृहात एक सूचक विधान देखील केलं. विजय वडेट्टीवार यांचं नाव घोषित करता करता उशीर झाला. आता आमच्या संग्रामभाऊंचं काय होणार माहिती नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

नाना पटोले यांनी अध्यक्षपद सोडलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते संग्रामभाऊ होणार असं आम्ही नेहमी ऐकत होतो. संग्रामभाऊंची चिठ्ठी झालीय. त्यावर सही झालीय. दिल्लीवरुन ती चिठ्ठी निघालीय, मात्र त्यांची चिठ्ठी नेमकी कुठे अडते, हे माहिती नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही, त्यांना आम्हाला द्यावा लागतो. आता तुम्ही ठरवा, न्याय देणार आहात की नाही, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. 

दरम्यान, विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी थेट दिल्लीला पत्र पाठवल्याचे समोर आले होते. या पत्रात काँग्रेसच्या ३० आमदारांचा मला पाठिंबा असल्याचे थोपटे यांनी दावा केला होता. संग्राम थोपटे यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असून मी विरोधीपक्षनेतेपदासाठी इच्छुक असल्याचे पत्रात म्हटलं होतं. 

वडेट्टीवारांचे सरकारकडून अभिनंदन- मुख्यमंत्री शिंदे

विजय वडेट्टीवारांचे सरकारकडून अभिनंदन, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. वडेट्टीवार विदर्भातील नेते आणि आमचे उपमुख्यमंत्रीदेखील विदर्भातले आहेत. विदर्भाच्या पाण्याला वेगळा गुण असतो. त्यामुळे राज्याच्या इतिहासात ४ विदर्भाचे मुख्यमंत्री मिळाले. विदर्भाला देशातील राष्ट्रपती मिळाले. पाहुणचार करण्यात विदर्भाचा हातभार कुणी धरू शकत नाही असं कौतुक शिंदेंनी केले.  विदर्भातील जेवणही कडक असते. तसाच स्वभाव विदर्भातील लोकांमध्ये आहे. विजय वडेट्टीवार यांच्यावर थोडा अन्याय झाला आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच त्यांना या जागेवर बसवायला हवं होते. अधिवेशन विना विरोधी पक्षनेता होईल असं वाटत होते. परंतु वडेट्टीवार ही कसर भरून काढतील, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसविजय वडेट्टीवारकाँग्रेसमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३