Join us  

गोगलगायीमुळे नुकसानीची भरपाई देणार, समिती स्थापणार; शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 6:11 AM

शंखी गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. शेतीच्या नुकसानीबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल

मुंबई :

शंखी गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. शेतीच्या नुकसानीबाबत विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.

लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना सत्तार यांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत शंखी गोगलगायीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्येही शंखी गोगलगायमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई किती द्यावी लागेल, यासाठी समिती स्थापन करून समितीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल. चर्चेत धनंजय मुंडे, अभिमन्यू पवार, नमिता मुंदडा आदी सहभागी झाले.निराधारांना वेळेत  मानधन मिळेल : देवेंद्र फडणवीस संजय गांधी निराधार योजनेतून मानधन वेळेत देण्यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली.सुनील कांबळे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर फडणवीस यांनी उत्तर दिले की, संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना मानधन देण्यात येते; पण कधी काही तांत्रिक अडचणींमुळे मानधन वेळेत देण्यात अडचणी येतात; पण या अडचणींवर मार्ग काढून मानधन वेळेत दिले जाण्यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल.सामाजिक न्याय मंत्री संजय राठोड यांनी या योजनेतून दिले जाणारे मानधन वाढवून देण्याबाबत शासन सकारात्मक असून, ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्याबाबत तातडीने बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.  

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाला महिनाभरात मान्यता ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगतानाच प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी घेऊन लवकरच मंत्रिमंडळाची मान्यताही घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले.

उर्ध्व गोदावरी प्रकल्पाबाबत आमदार धनंजय मुंडे, छगन भुजळ, जयंत पाटील यांनी सोमवारी लक्षवेधी मांडली होती. हा प्रकल्प मार्गी लागल्यास विदर्भ व मराठवाड्याला पाणी मिळेल. त्यामुळे तो तातडीने मार्गी लावण्याची मागणी ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी केली.

फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या चौथ्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेअंतर्गत मांजरपाडा वळण योजना, धोंडाळपाडा, ननाशी, पायरवाडा पुणेगाव कालवा, दरसवाडी कालवा यांचा समावेश आहे. या प्रस्तावावर व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत चर्चा होऊन प्रस्ताव विहीत पध्दतीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात यावा, असा निर्णय झाला आहे. जल आराखडा तयारदरम्यान, समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याच्या वापराबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली आहे. त्याबाबतचा जल आराखडा तयार करण्यात आलेला असून त्याची तांत्रिक व्यवहार्यता तपासणी करण्यात येत आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे