लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकल गाड्यांचे वेळापत्रक सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे थांबणाऱ्या २ एक्स्प्रेस एलटीटीवर थांबवण्याचा आणि तेथूनच सोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. वेळापत्रक बदलामुळे गर्दीच्या वेळी लोकलसाठी ट्रॅक उपलब्ध होतील. मध्य रेल्वेवर गर्दीच्या वेळी दक्षिण भारतातून मुंबईला येणाऱ्या एक्स्प्रेस उशिरा येतात. परिणामी, संपूर्ण रेल्वे मार्गावर ताण येतो. यासाठी सीएसएमटी - तिरुनेलवेली (१६३३१) आणि दादर - तिरुनेलवेली (२२६३०) या एक्स्प्रेसचा थांबा एलटीटी केला आहे, तसेच सीएसएमटी - अमरावती (१२१११) आणि सीएसएमटी - नागपूर दूरंतो एक्स्प्रेसच्या (१२२८९) वेळेतही बदल करण्यात आला आहे.
असे आहेत बदल
- सीएसएमटी - तिरुनेलवेली ही गाडी सीएसएमटी स्टेशनवरून रात्री ८:३५ वाजता सुटत होती ती आता रात्री ८:५० वाजता एलटीटीहून सुटेल, तर दादर - तिरुनेलवेली दुपारी ३:१० वाजता सुटत होती ती आता एलटीटीवरून दुपारी ३ वाजता सुटणार आहे.
- सीएसएमटी - अमरावती एक्स्प्रेस आता रात्री ८:१० ऐवजी रात्री ८:५० वाजता सुटेल तर सीएसएमटी - नागपूर दूरंतो एक्स्प्रेस संध्याकाळी ७:५५ ऐवजी रात्री ८: ३५ वाजता सुटेल.
पश्चिम रेल्वेवर पुन्हा ब्लॉक सत्र; आज १०२ फेऱ्या रद्द
- पश्चिम रेल्वेवर बुधवारी पुन्हा ब्लॉक घेण्यात येणार असून कांदिवली कारशेडच्या कामामुळे १०२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
- या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
- एमयूटीपी प्रकल्पांतर्गत कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीची पाचवी व सहावी मार्गिका पूर्ण झाली आहे.
- मात्र, कांदिवली कारशेडचे काम अपूर्ण असल्याने रेल्वे प्रशासनाने पुन्हा ब्लॉकचे नियोजन केले आहे.
- यापूर्वी मार्गिकेच्या कामासाठी २८ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. आता पुन्हा ब्लॉक सत्र सुरू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.