टीएमटीला हवे १३० कोटीचे कर्ज
By Admin | Updated: December 2, 2014 23:07 IST2014-12-02T23:07:00+5:302014-12-02T23:07:00+5:30
ठाणे महापालिका परिवहन अर्थात टीएमटी गाडा आजही रुळावर नसून, दिवसाला परिवहनला तब्बल पाच लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे

टीएमटीला हवे १३० कोटीचे कर्ज
ठाणे : ठाणे महापालिका परिवहन अर्थात टीएमटी गाडा आजही रुळावर नसून, दिवसाला परिवहनला तब्बल पाच लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मागील दहा वर्षापासूनची कामगारांची विविध स्वरुपाची तब्बल १०० कोटींची देणी देणे अद्यापही परिवहनला शक्य झालेले नाही. असे असतांना आता नव्याने येऊ घातलेल्या २३० बससाठी १३० कोटींचे कर्ज घेण्याचे निश्चित केले आहे. परंतु, ते फेडणार कसे या बाबत सध्या तरी टीएमटीडे कोणत्याही प्रकारचे उत्तर नाही.
एकीकडे ठेकेदारांची देणी शिल्लक असतांना कामगारांची देखील दहा वर्षापासूनची देणी देणे परिवहनला अद्यापही शक्य झालेले नाही. कामगारांची तब्बल १०० कोटींची विविध स्वरुपाची देणी देणे शिल्लक आहे. यामध्ये प्रवास, धुलाई, वैद्यकीय, पाच वेतन आयोगातील फरक, सहाव्या वेतन आयोगातील फरक आदींसह विविध स्वरुपाच्या भत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील आठ वर्षापासून वैद्यकीय आणि प्रवास भत्ताच बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिस्थिती अशी बेताची असतांना आता परिवहनमध्ये नव्याने सामील होणाऱ्या २३० बससाठी कर्ज घेण्याचे निश्चित केले आहे. जेएनएनयूआरएम अंतर्गत या बस घेण्यात येणार असल्याने यामध्ये ५० टक्के निधी केंद्राचा, ३० टक्के निधी राज्याचा आणि उर्वरित २० टक्के निधी परिवहनला उभा करावा लागत आहे. परंतु,परिवहनची सध्याची परिस्थिती खालावली असल्याने या बस खरेदीसाठी कर्ज घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर आला आहे. परंतु टीएमटीला हे कर्ज फेडणे शक्य होणार का? या बाबत साशंकता आहे. (प्रतिनिधी)