Join us  

व्हायरल सत्य! लोकसभा निवडणुकांत अफवा रोखण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची ‘टिपलाइन’ सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 6:00 AM

मजकुराची सत्यता तपासणे शक्य : तूर्त हिंदी, तेलुगू, बंगाली, मल्याळम भाषांमध्येच असेल सोय

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांत खोट्या बातम्यांचा प्रसार टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने टिपलाइन ही सुविधा मंगळवारपासून उपलब्ध करून दिली. तिच्या आधारे मजकूराची सत्यता व विश्वासार्हता व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना तपासता येईल. प्रोटो या भारतीय स्टार्टअप कंपनीने ही टिपलाइन तयार केली आहे. निवडणूक काळात पसरविल्या जाणाऱ्या अफवा, खोटी माहिती टिपलाइनद्वारे संकलित केली जाईल. आलेल्या बातम्या, माहितीबाबत शंका आल्यास युजर्स त्याची सत्यता तपासण्यासाठी +91-9643-000-888 या क्रमांकावर पाठवू शकतील. प्रोटो कंपनीच्या सेंटरमार्फत तिची सत्यता युजर्सला कळवली जाईल.

तूर्त इंग्रजी, हिंदी, तेलुगू, बंगाली, मल्याळम या भाषांतच ही सुविधा वापरता येईल. खोटी माहिती देणारी छायाचित्रे, व्हिडीओ लिंक, मजकूर यांची छाननी टिपलाइनद्वारे करता येईल. लोकसभा निवडणुकांमध्ये पसरविली जाणारी खोटी माहिती तात्काळ टिपलाइनला मिळावी, यासाठी प्रोटोने काही संस्थांचे सहकार्य मागितले आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अफवा पसरविण्यात आल्याने गेल्या वर्षी देशात लोकांना जबर मारहाण झाल्याचे व त्यात काही जण मरण पावल्याचे प्रकार घडले होते. अफवा रोखण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल केंद्राने व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या फेसबुकला धारेवर धरले होते. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने एक संदेश एकावेळी केवळ पाच जणांनाच पाठविण्याची व्यवस्था लागू केली. निवडणुकांत मतदारांना प्रभाव पाडण्यासाठी अफवा वा खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून झाल्यास संबंधित कंपन्यांवर कडक कारवाईचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

नाव उघड करण्यास मात्र नकारखोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात डिग डिपर मिडिया व मिडॅनने काही प्रकल्प राबविले होते. या कंपन्या टिपलाइन सुविधेसाठी प्रोटो कंपनीला मदत करत होत्या. तसेच व्हॉट्सअ‍ॅपनेही तंत्रज्ञानविषयक सर्व सहकार्य देऊ केले आहे. मात्र मूळ संदेश पाठविणाऱ्याचे नाव उघड करा, ही केंद्र सरकारची मागणी खासगीपणावर गदा आणणारी आहे असे व्हॉट्सअ‍ॅपचे मत आहे. त्यामुळे त्या कंपनीकडून ही नावे जाहीर करण्यात येत नाहीत.

टॅग्स :व्हॉटसअ‍ॅपलोकसभा निवडणूकराजकारणव्हायरल फोटोज्