विद्यार्थ्यांना शासनाकडून वेळेवर पाठ्यपुस्तके
By Admin | Updated: June 15, 2015 23:08 IST2015-06-15T23:08:56+5:302015-06-15T23:08:56+5:30
राज्य शासनाकडून आलेल्या शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये सोमवारी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच

विद्यार्थ्यांना शासनाकडून वेळेवर पाठ्यपुस्तके
डोंबिवली : राज्य शासनाकडून आलेल्या शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये सोमवारी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी केल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. महापालिकेच्या शिक्षण मंडळाने मात्र साहित्यवाटप न करण्याची आपली परंपरा कायम राखल्याची टीका पालकवर्गातून उमटली. महापालिकेच्या ७४ शाळांमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना भाषा, विज्ञान, माय इंग्लिश, गणित, भूगोल यासह अन्य सर्व विषयांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. डोंबिवलीतील पाथर्लीच्या भिसे गुरुजी शाळेमध्येही मुख्याध्यापिका श्यामल पाटणकर, मंडळाचे सदस्य शशिकांत कांबळे, महपालिकेचे विस्तार अधिकारी आर.टी. जगदाळे आदींनी विद्यार्थ्यांना त्यांचे वाटप केले. अशाच पद्धतीने सर्व शाळांमध्ये संबंधित अधिकारी, शिक्षकवर्ग आणि महापालिकेचे अधिकारी आदींनी त्याचे वाटप केले.
शाळांच्या फलकांवर रामनाथ सोनवणेच आयुक्त : महापालिकेचे आयुक्त मधुकर अर्दड यांनी केडीएमसीचा ताबा घेऊन आता चार महिन्यांहून अधिक काळ झाला. परंतु, तरीही शिक्षण मंडळाच्या शाळांच्या बोर्डावर अद्यापही तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांचेच नाव असल्याचे दिसून आले. महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शासनाची पुस्तके तर वेळेवर मिळाली. परंतु, महापालिकेकडून देण्यात येणारे साहित्य कधी मिळणार, असा सवाल पालकांनी त्यांना केला. मात्र, सत्ताधारी असल्याने कांबळे यांनी लवकरच देण्यात येणार, असे सांगून वेळ मारण्याचा प्रयत्न केला.