Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीसाठी दिवाळीनंतरचाच मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:54 IST

तोपर्यंत मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासक अर्थात आयुक्तांच्याच माध्यमातून चालेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात विविध मुद्द्यांवरील सुनावणी आता थेट मे महिन्यात होणार असल्याने या निवडणुका आता दिवाळीनंतरच होतील, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालिका सभागृह अस्तित्वात येण्यासाठी आणखी ९ ते १० महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. तोपर्यंत मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासक अर्थात आयुक्तांच्याच माध्यमातून चालेल.

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आली. पालिकेतील प्रभागांची संख्या किती असावी, या मुद्द्यावरून प्रकरण आधी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले तेथे प्रभागांची संख्या या मुद्द्यावर, तर राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर पुढील सुनावणी ६ मे महिन्यांत होईल, असे न्यायालयाने सांगितले.

मंगळवारच्या सुनावणीत निवडणुकीसंदर्भात स्पष्ट निर्देश आले असते तर पावसाळ्यापूर्वी निवडणूक घेणे निवडणूक आयोगाला शक्य होते. मात्र, आता सुनावणी लांबल्याने पावसाळ्यापूर्वी निवडणूक शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :निवडणूक 2024महानगरपालिका निवडणुक 2022