मुंबई विमानतळावरून वेळेत उड्डाण, आजपासून सुधारित प्रणाली लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:32 IST2018-06-03T00:32:34+5:302018-06-03T00:32:34+5:30
मुंबई विमानतळावरील इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (आएलएस) प्रणालीमधील सुधारणेचे काम पूर्ण झाल्याने मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे व लँडिंगमध्ये होणारा विलंब टळणार आहे.

मुंबई विमानतळावरून वेळेत उड्डाण, आजपासून सुधारित प्रणाली लागू
मुंबई : मुंबई विमानतळावरील इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (आएलएस) प्रणालीमधील सुधारणेचे काम पूर्ण झाल्याने मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे व लँडिंगमध्ये होणारा विलंब टळणार आहे. रविवारी पहाटे साडे पाच वाजल्यापासून या नवीन प्रणालीचा वापर मुख्य धावपट्टीसाठी करण्यात येईल.
विमानांचे धावपट्टीवर लँडिंग करताना खडतर हवामानात व इतरवेळीदेखील वैमानिकांना या प्रणालीद्वारे साहाय्य व मार्गदर्शन केले जाते. या प्रणालीच्या सुधारणेचे काम १७ मेपासून सुरू होते. त्यामुळे दररोज विमानांना सरासरी पाऊण ते एक तास विलंब होत होता. ५ जूनपर्यंत हे काम करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र दररोज होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांना त्रास होत असल्याने युद्धपातळीवर काम करून हे काम लवकर पूर्ण करण्यात आले.
एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएलएस प्रणालीच्या सुधारणेचे काम समाधानकारक झाले आहे. छत्रपती शिवाजी मुंबई विमानतळाद्वारे दररोज सुमारे ९४५ विमानांचे परिचालन केले जाते. एकच धावपट्टी असलेला हा देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे.
नवीन प्रणालीची तपासणी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर रविवारपासून सुधारित आयएलएस प्रणाली कार्यान्वित होईल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.
गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या कामामुळे मुंबई विमानतळावरील सुमारे ५ हजारांपेक्षा अधिक विमानांचे उड्डाण व लँडिंगला विलंब झाला होता. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.