तळपत्या लेखणीचा झुंजार प्रवास
By Admin | Updated: July 17, 2016 00:46 IST2016-07-17T00:45:08+5:302016-07-17T00:46:42+5:30
कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवायचे असेल तर प्रचंड वाचन आणि चिंतन केल्याशिवाय पर्याय नाही असे ज.दं. जोगळेकर नव्या पत्रकारांना, लेखकांना सांगत. त्यांचे स्वत:चे लेखनही अशाच

तळपत्या लेखणीचा झुंजार प्रवास
- ओंकार करंबेळकर
कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवायचे असेल तर प्रचंड वाचन आणि चिंतन केल्याशिवाय पर्याय नाही असे ज.दं. जोगळेकर नव्या पत्रकारांना, लेखकांना सांगत. त्यांचे स्वत:चे लेखनही अशाच प्रचंड वाचनावर आधारीत असे. लेखनातून आपल्या मनाला पटलेल्या विचाराला तर्कशुद्ध रितीने कसे मांडावे याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला.
साडेनऊ दशकांचा काळ हा अत्यंत मोठा काळ आहे. भारतीय विचारांमध्येच नव्हे तर जगातील विचारधारांमध्ये या शतकात मोठ्या प्रमाणावर बदल झाले. याच काळामध्ये जयंतराव जोगळेकर म्हणजे ज. द. जोगळेकर यांनी या सर्व विचारांमधील बदलांचे निरीक्षण करत आपल्या प्रखर राष्ट्रवादी विचारांची ज्योत तेवत ठेवली. त्यांच्या जाण्याने आपली मोठी हानी झाली आहे. गेल्या पाऊणशे वर्षांपासून अधिक काळ ज.दं.नी क्रांती हिंदुत्व आणि राष्ट्रवादावर नित्य आणि अत्यंत आभिजात दर्जाचे लेखन केले.
ज. द. जोगळेकर यांचा जन्म ७ आॅक्टोबर १९२१ साली चिखलवाडी येथे झाला. जोगळेकरांच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ बडोद्यामध्ये गेला. बडोद्यातील मराठी वातावरण, तत्कालीन परिस्थिती आणि जीवनाबद्दल जोगळेकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात भरभरून लिहिले आहे. वकिलीचे शिक्षण मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात नोकरी करताना आलेले अनुभवही त्यांनी लेखनातून मांडले आहेत. नंतर ते पुण्यामध्ये आले. याच काळामध्ये त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर, हॉटसन गोगटे आणि समकालिन विचारवंतांच्या व क्रांतिकारकांच्या जवळ जाता आले. सावरकरांची भाषणे, त्यांच्याशी होणाऱ्या चर्चा यांचा जोगळेकरांच्या विचारांवर, लेखनावर मोठा प्रभाव पडला. हिंदुमहासभेने झपाट्याने केलेले कार्य त्याचा विकास त्यांनी जवळून पाहिला होता. त्यानंतर, परदेशामध्येही ते शिक्षणासाठी काही काळ जाऊन आले. परदेशात जाण्याचा निर्णय अविवेकी वाटल्यानंतर त्यांना काही काळ नैराश्यही वाटले. मात्र जिद्द, प्रचंड अभ्यास आणि परिश्रम या जमेच्या बाजू असणाऱ्या ज.दंना पुन्हा पाय रोवून उभे राहता आले. परदेशातून आल्यावर त्यांनी राष्ट्रवाद आणि हिंदुत्ववादावरील लेखनावर भर दिला, काही काळ उपसंपादकाची नोकरीही केली. बेस्टमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना, त्यांनी सर्वांशी स्नेहपूर्वक आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. मात्र, वयाची ५५ वर्षे पूर्ण होताच, त्यांनी नोकरीला विराम दिला.
जयंतराव जोगळेकरांनी डॉ. शोभाताई यांच्याशी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केला. विवाहाच्या आधी चर्चा सुरू असताना शोभातार्इंनी त्यांना माझ्याशी विवाह का करावासा वाटतो, असे विचारताच जोगळेकर उत्तरले होते, ‘आय अॅम नॉट मॅरिइंग यू, आय अॅम मॅरिइंग युअर बँक अकाउंट.’ आपल्या पत्नीबाबतच्या आठवणी आणि तिची आपल्या जीवनास झालेली मदत याबाबत त्यांनी अत्यंत कृतज्ञतेने व कृतार्थ भावनेने लिहिले आहे. डॉ. शोभातार्इंचे आपल्या जीवनात असलेले स्थान त्यांनी अत्यंत आदराने त्यांच्या आत्मचरित्रात मांडले आहे.
प्रखर तळपती लेखणी ही जयंतराव जोगळेकरांची खरी ओळख. कोणत्याही लेखनापूर्वी आणि कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ते करत असणारी तयारी नव्या लेखकांना निश्चितच प्रेरणादायी आहे. प्रचंड संदर्भ, आपण मांडत असणाऱ्या संकल्पनेची बुद्धिवादी मांडणी, राष्ट्रीय प्रेरणेचे विवेचन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. ‘हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व’पासून त्यांनी सुरू केलेला तर्कशुद्ध लेखनाचा प्रवास साठ वर्षे अविरत सुरू होता. ‘भारतीय युद्धशास्त्राची उपेक्षा,’ ‘रिशेल्यू ते केमाल निधर्मी राष्ट्रवादाचे जनक’ यांसारख्या अनेक गं्रथांमधून त्यांनी वाचकांना प्रेरणास्थाने शोधण्यात मदत केली. त्यांनी लिहिलेल्या ‘चिनी राज्यक्रांती’, ‘फ्रेंच राज्यक्रांती’, ‘रशियन राज्यक्रांती’ या ग्रंथांनीही मराठी लेखनविश्वात अमिटसा ठसा निर्माण केला, हे निश्चित.
‘जदं’ची गाजलेली पुस्तके
अफगाणिस्तानात तालिबानचा पराभव, अमेरिकन क्रांती, इंग्रजांच्या दृष्टिकोनातून १८५७चा प्रस्फोट, एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा(आत्मचरित्र), चिनी राज्यक्रांती, जगातील इस्लामी समाजाची हालहवाल, जागतिक राष्ट्रवादाचे प्रवाह नि हिंदुस्तान, दोन युद्धे, निधर्मी राष्ट्रवादाचे शिल्पकार, पहिले क्रुसेड, पुनरुत्थान, फ्रेंच राज्यक्रांती, भारतीय युद्धशास्त्राची उपेक्षा, युगप्रवर्तनाच्या उंबरठ्यावरचे अरब जग, रशियन राज्यक्रांती, डॉ. शोभा जोगळेकर: एका तपस्विनीची कथा, समीक्षा-संचित, साम्यवादी देशातील फेरफटका, सेक्युलॅरिझम, स्वातंत्र्यवीर सावरकर एक वादळी जीवन, हिंदुत्व, हिंदुत्व आणि इतर विचारधारा, हिंदुत्ववादी धुरंधर नेते, हिंदुस्थान पाकिस्तान-वैचारिक संघर्षाती प्रतीके, हिंदुस्थानचे राष्ट्रीयत्व, हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदू राष्ट्रवादाचे स्त्रोत, हिंदुंच्या भवितव्याचा शोध, ज्ञानयुक्त क्रांतियोद्धा, डिसिसिव्ह बॅटल्स इंडिया लॉस्ट.