Join us  

वाघ माझ्या जिव्हाळ्याचा विषय, मुख्यमंत्र्यांकडून सर्वांना व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 2:18 PM

वाघ हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असून महाराष्ट्रातील वाघांची संख्या जवळपास 300 च्या वर आहे. ज्या जंगलात वाघ असतो, त्या जंगलाचं निसर्गचक्र पूर्ण मानलं जात.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, व्याघ्र दिन केवळ एक दिवसाचा साजरा न होता, ही वनसंपत्ती आणि जंगलसंपत्ती आपण वाढवली पाहिजे. जगातील काही देश केवळ जंगलसंपत्तीवर देशाचं अर्थचक्र चालवतात. त्यामुळे आपणही आपल्या वनसंपत्तीचं जतन करायला हवं, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

वाघ हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असून महाराष्ट्रातील वाघांची संख्या जवळपास 300 च्या वर आहे. ज्या जंगलात वाघ असतो, त्या जंगलाचं निसर्गचक्र पूर्ण मानलं जात. ज्या जंगलात वाघ असतो, वाघ राहतो, त्या जंगलात त्याला लागणारं अन्न, म्हणजेच गवत-झाडपाला खाणारे प्राणी त्या जंगलात आहेत. ज्या जंगलात वाघ आहे, त्या जंगलात निसर्गाचं चक्र पूर्ण असते. व्याघ्र दिन एक दिवसाचा न साजरा करता, सर्वांनी हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून आपली ही वनसंपत्ती जतन आणि संवर्धन कराण्यासाठी काम केलं पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

दरम्यान, राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अंदाजपत्रानुसार देशात २,९६९ वाघांचा अधिवास आहे. या अहवालानुसार व्याघ्रसंवर्धनात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून,  राज्यात ३१२ वाघ असल्याचे समोर आले. २०१४ साली राज्यात वाघांची संख्या १९० होती. ती आता ६४ टक्क्यांनी वाढली आहे. अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वाघांच्या अस्तित्वापुढे शिकारीचे संकट घोंगावत आहे. सन १९०० मध्ये जगात असलेले एक लाख वाघ आता फक्त ४,४०० शिल्ल्क राहिले आहेत. देशात २,९६७ तर महाराष्ट्रात ३१२ वाघ उरले आहेत. जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ असल्याने व्याघ्रसंवर्धनात भारताची मान उंच आहे.

जगात वाघाच्या नऊ प्रजाती होत्या. त्यातील कॅस्पियन, जावनिय आणि बॅलिनिज या तीन प्रजाती नामशेष झाल्या आहेत. महाराष्ट्रात पश्चिमेकडील जंगलात वाघाचे प्रमाण बरेच घटले आहे. विदर्भात अधिक वाघ असून पेंच, ताडोबा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ही संख्या अधिक आहे.वाघांच्या शिकारी, तुटत चाललेली अन्नसाखळी हे संख्या घटण्यामागील कारण सांगितले जाते. यासोबतच रस्ता अपघात, करंट लागल्याने होणारे मृत्यू, संघटित शिकारी टोळ्या, तस्करांकडून असणारे धोके ही सुद्धा कारणे सांगितली जातात.

टॅग्स :वाघउद्धव ठाकरेमुंबई