समस्यांच्या गर्तेत टिटवाळा

By Admin | Updated: June 6, 2015 23:10 IST2015-06-06T23:10:39+5:302015-06-06T23:10:39+5:30

टिटवाळा म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहते ते गणपती मंदिर. यामुळे या ठिकाणी रोज हजारो भाविक-भक्तांची गर्दी दिसून येते.

Tidy in the groove of problems | समस्यांच्या गर्तेत टिटवाळा

समस्यांच्या गर्तेत टिटवाळा

उमेश जाधव

टिटवाळा - टिटवाळा म्हटले की, डोळ्यांसमोर उभे राहते ते गणपती मंदिर. यामुळे या ठिकाणी रोज हजारो भाविक-भक्तांची गर्दी दिसून येते. परंतु, या भाविकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. जागोजागी खोदलेले रस्ते, अपूर्ण कामे, धुळीचा त्रास, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेली गटारे, वारंवार खंडित होणारी वीज, अशा प्रकारच्या विविध समस्यांना येथील जनतेला सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी आपल्या प्रभागाच्या विकासाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी आणला आहे. परंतु, प्रशासन व ठेकेदारांच्या उदासीन व संथगतीच्या कामामुळे टिटवाळावासीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी जागोजागी खोदून ठेवल्याने छोटेमोठे होणारे अपघात, धुळीचा त्रास, होणारे आजार, कचराकुंड्यांचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तुटलेली-फुटलेली व घाणीने तुंबलेली गटारे, रस्त्यांवरून वाहणारे गटाराचे पाणी यामुळे रोगराईला आमंत्रण अशा प्रकारच्या समस्या सध्या टिटवाळा प्र.क्र. ६ मध्ये पाहावयास मिळतात. परंतु, याबाबत पालिका प्रशासन, अधिकारी व ठेकेदारांचा कामचुकारपणाच याला कारणीभूत आहे. पालिकेने या ठिकाणी विविध आरक्षणे टाकली आहेत. उदा. बगीचा, नानानानी पार्क, भाजी मंडई, मच्छी मार्केट, शाळा, दवाखाना. परंतु, या सर्व आरक्षित जागांवर सध्या अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.
या सेवांची प्रतीक्षा कधीपर्यंत करावी लागेल, याच आशेत टिटवाळावासी आहेत. येत्या पावसात रस्त्यांची अपूर्ण कामे व गटारांची राहिलेली सफाई यामुळे पाणी जागोजागी तुंबणे, तसेच मोठमोठ्या विकासकांनी नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण करून बुजविलेल्या नाल्यांमुळे पाणी तुंबून नागरिकांना पुराच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असल्याने त्यांच्या सांडपाण्याने पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य पसरेल. चार वर्षांपूर्वी पालिकेच्या मलनि:सारण विभागाने भुयारी गटाराचे काम केले, परंतु अद्याप ही गटारलाइन सुरू झालेली नाही.

बगीच्याकरिता आम्ही पालिका प्रशासनाचा पाठपुरावा करून ४० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. जागादेखील उपलब्ध आहे. परंतु, काही अडचणींमुळे हे काम थांबले आहे. म्हणजे विकासकामांचा पाठपुरावा करून कामे आणून तात्त्विक अडचणींमुळे विकासाला खीळ बसते.
- उपेक्षा भोईर, नगरसेविका, प्र.क्र. ६ टिटवाळा

Web Title: Tidy in the groove of problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.