कुरघोड्यांनी मंदावली घड्याळाची टिकटिक

By Admin | Updated: August 20, 2014 00:47 IST2014-08-20T00:47:14+5:302014-08-20T00:47:48+5:30

आबा-जयंतरावांच्या खेळ्या : विधानसभेसाठी राष्ट्रवादीतील प्रमुख इच्छुकांची गर्दी आटली!

Tick ​​down the slowdown clock | कुरघोड्यांनी मंदावली घड्याळाची टिकटिक

कुरघोड्यांनी मंदावली घड्याळाची टिकटिक

श्रीनिवास नागे - सांगली  --संजयकाका पाटील भाजपचे खासदार झाले आणि जिल्ह्यावर हुकुमत गाजवणाऱ्या राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक मंद व्हायला लागली. ही अवघ्या काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आता तर राष्ट्रवादीतील दोन्ही दिग्गज मंत्र्यांच्या कुरघोड्या, गटबाजी, लोकसभा निवडणुकीतून निर्माण झालेली पराभूत मानसिकता आणि महायुतीची हवा यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी पक्षातील प्रमुख इच्छुकांची गर्दी आटली आहे.
शह-काटशह, हल्ले-प्रतिहल्ले, जिरवा-जिरवी, खेळ्या-कुरघोड्या हे राष्ट्रवादीतील परवलीचे शब्द. गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील हे दोघेही राष्ट्रवादीचे मंत्री. मात्र जिल्ह्यात आपापला गट सांभाळत या दोघांनीच हे परवलीचे शब्द प्रचलित केले. संजयकाका पाटील हे आबांचे कट्टर विरोधक असले तरी जयंतरावांशी त्यांची जवळीक होती आणि आताही आहे! संजयकाका भाजपमध्ये जाण्यात आणि खासदार होण्यात जयंतरावांचाही वाटा होता, असे खुद्द राष्ट्रवादीचीच मंडळी सांगतात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतीक पाटलांचा किल्ला आबाच लढवत होते. आघाडी धर्माचे पालन हे वरवरचे कारण होते, तथापि खरे कारण होते, संजयकाकांना कडवा विरोध. त्यावेळी जयंतरावांचे शिलेदार काय करत होते, हे अख्ख्या जिल्ह्याने पाहिले. तेव्हापासून जयंतराव आणि आबा गटाच्या एकमेकांवरच्या कुरघोड्या वाढल्या. महायुतीला ‘अच्छे दिन’ येत असल्याचे दिसताच राष्ट्रवादीतील दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेत्यांची महत्त्वाकांक्षा उफाळून आली... आणि खेळ्या-कुरघोड्यांच्या राजकारणाला गती आली.
तासगाव-कवठेमहांकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडेंना संजयकाकांनी आधीच हाताशी घेतले होते. घोरपडे पूर्वाश्रमीचे दिवंगत राजारामबापूंचे अनुयायी; पर्यायाने जयंतरावांचे साथीदार. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमधून आबांविरोधात शड्डू ठोकला. त्यानंतर लगेच हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून तो भाजपला जाऊ नये यासाठी सेनेच्या दिवाकर रावतेंनी आकांडतांडव केले. घोरपडे तिकीट वाटपाआधीच गारद व्हावेत, यासाठी रचलेली ही चाल होती. ‘चित्रकूट’वरून केलेले इशारे त्यामागे असल्याची चर्चा सुरू झाली. आता म्हणे राष्ट्रवादीच्या जयसिंगतात्या शेंडगेंना शिवसेना खुणावू लागली आहे. शेंडगे आणि घोरपडे हे राजकीय हाडवैरी. धनगर समाजाच्या ‘व्होट बँके’च्या बळावर प्रकाश आणि रमेश या चुलतबंधूंनंतर जयसिंगतात्यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली, की घोरपडेंना थोपवण्यासाठी खेळलेली ही खेळी असावी, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
खानापूर-आटपाडीत माजी आमदार अनिल बाबर यांनी लोकसभेला आबांच्या सूचनेनुसार संजयकाकांच्या विरोधात प्रचार केला, तर काँग्रेसचे आमदार सदाशिवराव पाटील यांनी संजयकाकांना मदत केली. राष्ट्रवादीतून मिळणाऱ्या रसदीबाबत साशंकता आणि महायुतीचे वारे यामुळे बाबर यांनी शिवसनेनेत उडी घेतली आहे. आबांचे ‘धाकटे बंधू’ अशी ओळख असणाऱ्या बाबर यांनी एकीकडे भगवा खांद्यावर घेतला, तर दुसरीकडे आटपाडीचे राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आबांच्या उपस्थितीतच बंड जाहीर केले. संजयकाकांना मदत करणाऱ्या आ. पाटील यांचा बीमोड करण्यासाठी हे दोन मोहरे पुढे आणले गेले आहेत.
सांगलीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत संजयकाकांना मदत केली. ते काही दिवसांपूर्वी जयंतरावांसोबत होते. मात्र मधल्या काळात दुरावले गेले आणि आबांनी त्यांना जवळ केले. पक्षावर टीका करून त्यांनी भाजपची वाट जवळ केली, तथापि त्यांचे घोडे अडले. त्यांनी शहरभर संजयकाकांसोबतची होर्डिंग्ज लावली, पण पक्षाने कारवाईचे धाडस दाखवले नाही. त्यातही कुरघोड्यांचे राजकारण होते.
इस्लामपूर मतदारसंघात विरोधक एकवटत नाहीत, ही जयंतरावांची जमेची बाजू. यावेळी नानासाहेब महाडिक यांच्यासोबत सर्व विरोधक एकत्र येत असल्याचे दिसताच राष्ट्रवादीचे कवठेपिरानचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माने तसे आबांचे चाहते आणि समर्थक. मतदारसंघातील मिरज पश्चिम भागात मानेंचा गट प्रबळ असल्याने अलीकडे जयंतरावांनी त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न केले होते, परंतु जिल्हा परिषद अध्यक्षपद न मिळाल्याने माने त्यांच्यावर नाराज होते. माने यांच्या सेनाप्रवेशामागे नेमके काय कारण असावे, हे समोर आले नसले तरी ही जिरवाजिरवीची तयारी असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Tick ​​down the slowdown clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.