ठुमरीला कमी लेखले जाते
By Admin | Updated: January 8, 2015 00:38 IST2015-01-08T00:38:02+5:302015-01-08T00:38:02+5:30
आजकाल सगळेच ठुमरी, उपशास्त्रीय संगीताला दुय्यम स्थान देतात, पण संगीत हा प्रकार सगळीकडे उच्च आहे आणि अभिजातच आहे.

ठुमरीला कमी लेखले जाते
मुंबई : आजकाल सगळेच ठुमरी, उपशास्त्रीय संगीताला दुय्यम स्थान देतात, पण संगीत हा प्रकार सगळीकडे उच्च आहे आणि अभिजातच आहे. शास्त्रीय संगीत तेवढे अभिजात आणि बाकी सगळे प्रकार दुय्यम असे मानून ठुमरीला कमी लेखले जाते, अशी खंत व्यक्त करीत, ठुमरी काय किंवा उपशास्त्रीय संगीत काय, त्यालाही क्लासिकलचा दर्जा मिळावा ही इच्छा आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ गायिका शुभा जोशी यांनी मांडले आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात ठुमरी, बंदिशी, गझल सादर करून प्रेक्षकांना थेट शोभा गुर्टू यांची आठवण करून दिली.
शब्दगप्पांच्या मुलाखतीत मंगळवारी संगीत अभ्यासक केशव परांजपे यांनी शुभा जोशी यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. प्रसिद्धीची हाव, कलेचा कमर्शिअल इव्हेंट, शो-शायनिंग यापासून जाणीवपूर्वक दूर राहून उपशास्त्रीय संगीताची अविरत सेवा करणाऱ्या या गुणी गायिकेने शब्दगप्पांच्या मंचावर मोकळेपणाने आपली कला सादर केली आणि दर्दी प्रेक्षकांनी त्यांना मनापासून दाद दिली.
‘मला संगीतातील जे जे प्रकार आवडले ते सगळे शिकायला मिळाले आणि त्यावर कालांतराने प्रभुत्वही मिळविता आले हीच मोठी समाधानाची बाब असल्याचे’ त्यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ ठुमरी गायिका शोभा गुर्टू यांच्या शिष्या असलेल्या शुभा जोशींनी त्यांचे सुरुवातीचे गुरू आंबेरकर मास्तर यांच्याकडे गाण्याची चौकट कशी पक्की झाली आणि नंतरचे गुरू रमाकांत नाडकर्णी यांच्याकडे परफॉर्मन्स आणि लय कशी शिकायला मिळाली याचे अनुभव सांगितले. गझलगुरू ताज अहमद खाँ साहेब आणि अर्थातच शोभा गुर्टू यांच्या लकबी आणि गाणे शिकविण्याच्या प्रत्येकाच्या तऱ्हा कशा वेगवेगळ्या होत्या याचे मजेशीर किस्सेही सांगितले. ‘मी मात्र चिकाटी आणि जिद्द कधीही सोडली नाही कारण मला शिकायचेच होते. त्यामुळे तो सोशिकपणा बाळगूनच मी वयाच्या ४५ व्या वर्षांपर्यंत शिकत राहिले,’ असेही त्या म्हणाल्या.
गुजराती मैत्रिणीने शिकविलेले काठियावाडी ढंगाचे मीरेचे भजन सदर करून प्रेक्षकांना एका वेगळ्या जातकुळीतील गाण्याचा आस्वाद दिला. सुरुवातीला गाणे शिकताना आलेला कंटाळा गुरुजींनी शास्त्रीय संगीतावर आधारित सिनेमातील गाणी शिकवून कसा घालवला याची आठवण सांगितली. ‘आई-वडिलांनी मी लहान असतानाच माझ्या गळ्यातील सूर ओळखून मला या क्षेत्रात ढकलले आणि सतत चांगले संगीत माझ्या कानावर पडत राहिले म्हणून मी या क्षेत्रात येऊ शकले, अशी कृतज्ञतापूर्वक कबुलीही त्यांनी दिली. शोभा गुर्टू यांच्या आवाजातील गाणी ऐकल्यावर मला माझा मार्ग सापडला आणि आपल्या आवाजात काय चांगले गाता येईल याचा शोध लागला तो दिवस आयुष्यातील खरा टर्निंग पॉइंट ठरल्याने नंतर मागे वळून पाहिलेच नाही,’ असे जोशी म्हणाल्या. (प्रतिनिधी)