Join us

झवेरी बाजारातील सराफाचे २० लाखांचे सोने घेऊन ठग पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 05:15 IST

एलटी मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मुंबई : झवेरी बाजारातील सराफाला सोशल मीडियावरून ओळख झालेल्या सराफासोबत व्यवहार करणे भलतेच महागात पडले आहे. हाच ठग सराफाचे २० लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार झाला आहे. त्यानुसार, एलटी मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, आरोपीचा शोध सुरू केला आहे.तक्रारदार राकेश जैन (४३) यांचा सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. ते होलसेलच्या भावाने सोन्याच्या दागिन्यांची आर्डर देतात व त्यांच्या दुकानात रीटेल भावाने त्याची विक्री करतात. जुलैमध्ये सोशल मीडियाद्वारे त्यांची ओळख पुण्यातील सोने व्यापारी गौरव दिनेश सोनीसोबत झाली. त्यानंतर, त्याच्याशी मोबाइलवरून संपर्क झाला व तेव्हा गौरव हासुद्धा सोन्याच्या दागिन्यांची विक्री करीत असल्याची माहिती मिळताच, दोघांनी एकमेकांकडील दागिन्यांचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले. त्यानंतर गौरव सोनी याने आॅगस्ट महिन्यात जैन यांची भेट घेतली. सोबत व्यवहार करण्याबाबत सुचविले. दाखविलेल्या डिझाइनदेखील सोनीला आवडल्या. त्यानुसार, ५ आॅगस्ट रोजी त्याने अडीच लाखांचे दागिने घेतले. ठरल्याप्रमाणे, २२ आॅगस्ट रोजी आर.टी.जी.एस.ने पैसेही पाठविले. पुढे आणखीन दागिन्यांची आॅर्डर देत, त्याचेही पैसेही पाठविले. त्यामुळे जैनवरचा विश्वास वाढला. पुढे एका व्यवहारातील २ लाख २८ हजार रुपये येणे बाकी होते.पुण्यातील, तसेच नाशिक येथील व्यापाऱ्यांकडून सोन्याच्या दागिन्यांची आर्डर असल्याने आणखीन सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. जैन यांनीदेखील विश्वास ठेवून त्याच्याकडे दागिने दिले. अशा प्रकारे, २० आॅगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत २० लाख ६ हजार ५७८ किमतीचे दागिने घेऊन तो नॉट रिचेबल झाला. जैन यांनी वेळोवेळी त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी एलटी मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला.