नर्सरीच्या प्रवेशाला आता तीन वर्षांची अट

By Admin | Updated: January 22, 2015 01:36 IST2015-01-22T01:36:33+5:302015-01-22T01:36:33+5:30

इयत्ता पहिलीतील प्रवेशाकरिता सहा वर्षे वयाची अट राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पुढील तीन वर्षांकरिता शिथिल केली आहे.

Three years of nursery admission now | नर्सरीच्या प्रवेशाला आता तीन वर्षांची अट

नर्सरीच्या प्रवेशाला आता तीन वर्षांची अट

मुंबई : इयत्ता पहिलीतील प्रवेशाकरिता सहा वर्षे वयाची अट राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पुढील तीन वर्षांकरिता शिथिल केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात ज्या मुलाने वयाची पाच वर्षे पूर्ण केली आहेत त्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्याचा शासन निर्णय बुधवारी लागू करण्यात आला. त्याचबरोबर प्ले ग्रुप अथवा नर्सरी प्रवेशाकरिता २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाकरिता ३१ जुलै रोजी वयाची तीन वर्षे पूर्ण केल्याची अट लागू केली.
राज्य शासनाने ११ जून २०१० रोजी काढलेल्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिली प्रवेशाची वयोमर्यादा ६ वर्षे निश्चित केली होती. राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळा, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई, आय.बी. अशा विविध प्रकारच्या शाळांमध्ये पहिली प्रवेशाकरिता वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ््या दिनांकास ग्राह्य धरून प्रवेश दिले जात होते. त्याचबरोबर पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. यामध्ये एकवाक्यता आणण्याकरिता शिक्षण संचालक (प्राथ) यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने केलेल्या शिफारशीनुसार आता पहिली व प्ले ग्रुप-नर्सरीमधील प्रवेशाचे वय निश्चित केले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार प्ले ग्रुप-नर्सरी (इ. १ली पूर्वीचा ३ रा वर्ग) किमान वय ३१ जुलै रोजी तीन वर्षांपेक्षा अधिक असेल. या निर्णयाची अंमलबजावणी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात केली जाईल. याच विद्यार्थ्यांचा इ. १लीचा प्रवेश २०१८-१९ मध्ये वयाची ६ वर्षे पूर्ण केल्यानंतर होईल. मात्र यंदाच्या वर्षी इयत्ता पहिलीच्या प्रवेशाकरिता ३१ जुलै रोजी प्रवेशाचे किमान वय ५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असेल. या निर्णयाची अंमलबजावणी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून होईल. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात ३१ जुलै रोजी वयाची पाच वर्षे चार महिने पूर्ण केलेल्या बालकाला इ. १लीच्या वर्गात प्रवेश दिला जाईल. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ३१ जुलै रोजी वयाची ५ वर्षे ८ महिने पूर्ण केलेल्या बालकाला इ. १लीच्या वर्गात प्रवेश दिला जाईल तर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात ३१ जुलै रोजी वयाची ६ वर्षे पूर्ण केलेल्या बालकाला
इ. १लीच्या वर्गात प्रवेश दिला
जाईल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Three years of nursery admission now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.