हेलि टूरिझमसाठी तीन निविदा
By Admin | Updated: August 25, 2015 05:10 IST2015-08-25T05:10:18+5:302015-08-25T05:10:18+5:30
पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून दर्शन घडविण्याचा निर्णय एमटीडीसीने (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) घेतला आहे. यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याला तीन

हेलि टूरिझमसाठी तीन निविदा
मुंबई : पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून दर्शन घडविण्याचा निर्णय एमटीडीसीने (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) घेतला आहे. यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याला तीन कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले.
मुंबईचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र येणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबईचे हेलिकॉप्टरमधून दर्शन घेण्याची सुविधा नाही. हे पाहता एमटीडीसीने पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून दर्शन घडवण्याचा निर्णय घेतला. मुंंबई दर्शनात जुहू ते नरिमन पॉइंट आणि जुहू ते ठाणे असे दर्शन घडेल. हे दोन्ही दर्शन वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये पर्यटकांना घडणार आहे. यासाठी अर्ध्या तासाचा तसेच एक तासाचा अवधी पर्यटकांना देण्यात येईल. यासाठी निविदाही काढण्यात आली आहे.
या निविदांना तीन कंपन्यांकडून प्रतिसाद देण्यात आल्याचे सांगण्यात आले. बॅरेन लक्झरी हॉस्पिटॅलिटी लिमिटेड, पवनहंस प्रायव्हेट लिमिटेड आणि गिरीसन एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडकडून निविदा भरण्यात आली आहे. प्रथम टेक्निकल बिड (बोली) खुली करण्यात आली असून नंतर फायनान्शियल बिड खुली होईल, असे सांगण्यात आले.
मुंबई दर्शनानंतर पर्यटकांसाठी हवाई सफरीचे आणखी काही प्रस्ताव आखण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई ते एलिफंटा, मुंबई ते अजंठा, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते नाशिक-त्र्यंबकेश्वर यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)