Join us

लोकल, मेल गाड्यांसाठी लवकरच ३ स्वतंत्र मार्गिका; पनवेल, कल्याणकरांचा प्रवास होणार सुखकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 15:07 IST

यामुळे उपनगरीय लोकल सेवा अधिक सुरळीत व नियमित चालवता येतील

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गापासून लांब पल्ल्याच्या गाड्या स्वतंत्र चालविण्याच्या दृष्टीने मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यात नवीन मार्गिका उभारण्याचा आराखडा असून, 'एमयूटीपी-३ ब'अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी मागविण्यात आला आहे. राज्य सरकार या प्रकल्पांवर लक्ष ठेवून असून, काही महिन्यांत याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन प्रकल्पांमुळे पनवेल, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याणकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

'एमयूटीपी-३ ब'चा मुख्य उद्देश

मुंबईतील मुख्य व उपनगरीय मार्ग पूर्णपणे स्वतंत्र करण्याचा आहे. यामुळे उपनगरीय लोकल सेवा अधिक सुरळीत व नियमित चालवता येतील. सध्या पनवेल-वसई मार्ग लांब पल्ल्याच्या गाड्यांसोबतच मेमू सेवांसाठी वापरला जातो; प्रस्तावित नवीन मार्ग मात्र केवळ उपनगरीय गाड्यांसाठी असणार आहे. याशिवाय वसई-विरार व वसई-बोरिवली दिशांना प्रत्येकी एक असे उन्नत उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे भविष्यात पनवेलवरून ठाणे-दिवामार्गे विरार-अंधेरीपर्यंत लोकल गाड्या धावणे शक्य होईल. प्रस्तावित मार्गिका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व पनवेल रेल्वे टर्मिनसशीही जोडल्या जाण्याची शक्यता आहे.

लोकल सेवा वाढण्यास मदत

नवीन मार्गिकांमुळे लोकलच्या वेळापत्रकामध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे. याशिवाय मेल आणि लोकल मार्गिका स्वतंत्र झाल्यावर लोकलच्या सेवा वाढवण्यास मदत होणार आहे. यामुळे महामुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होणार आहे.

असे असणार नवीन मार्ग

  • कल्याण-कसारा व कल्याण-कर्जतदरम्यान नवीन कॉरिडॉर, विद्यमाना मार्गाचे चौपदरीकरण.
  • आसनगाव-कसारा आणि बदलापूर-कर्जत मार्गावर स्वतंत्र दुहेरी मार्गिका.
  • पनवेल आणि वसईदरम्यान ६० कि.मी. लांबीची नवीन उपनगरीय मार्गिका.
टॅग्स :मुंबई लोकल