आॅनलाइन औषध विक्रीवर महिन्यात तीन कारवाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2015 01:51 IST2015-04-19T01:51:18+5:302015-04-19T01:51:18+5:30
आॅनलाइन शॉपिंग’ वेबसाईटवरून कपडे, गॉगल, सौंदर्य-प्रसाधनांसोबतच औषधांच्या अवैधरीत्या विक्रीचा ट्रेण्ड लक्षात येताच त्याला पायबंद घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंबर कसली आहे.
आॅनलाइन औषध विक्रीवर महिन्यात तीन कारवाया
मुंबई : ‘आॅनलाइन शॉपिंग’ वेबसाईटवरून कपडे, गॉगल, सौंदर्य-प्रसाधनांसोबतच औषधांच्या अवैधरीत्या विक्रीचा ट्रेण्ड लक्षात येताच त्याला पायबंद घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंबर कसली आहे. गेल्या महिन्याभरात तीन आॅनलाइन कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
संबंधित वेबसाईटवरून सर्दी-खोकल्यापासून लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या औषधांची सररास विक्री सुरू असून, ते घातक असल्याचे ‘एफडीए’ने स्पष्ट केले आहे. आॅनलाइन औषध विक्रीबाबत महिन्याभरात ‘केमिस्ट आॅनलाइन’, ‘स्नॅपडील’ आणि ‘अॅमेझॉन’ या कंपन्यांविरोधात कारवाई केली. भविष्यातही अशाच प्रकारे कारवाई केली जाईल, असे एफडीएचे सहआयुक्त (औषध) एस. टी. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मार्च महिन्यात केमिस्ट आॅनलाइन नावाने कंपनी सुरू झाली. ही कंपनी जीवन मेडिकलशी संलग्न होती. त्याची माहिती समजताच ‘एफडीए’ने कंपनीच्या घाटकोपर येथील मुख्यालयावर धाड घातली. शहानिशा केल्यावर कंपनीकडे औषध विक्रीचा परवानाच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ‘एफडीए’ने कंपनीला कारणे दाखवा नोटीस धाडून स्पष्टीकरण मागितले. या कारवाईमुळे कंपनीने औषधविक्री थांबविली. घाटकोपरमध्ये केलेल्या कारवाईतून आॅनलाइन औषधविक्रीचा ट्रेण्ड अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यामुळे आॅनलाइन शॉपिंग साईटवर ‘एफडीए’ अधिकाऱ्यांची करडी नजर होती. त्यातच रायगड येथील एका औषध दुकानदाराने केलेल्या तक्रारीनंतर स्नॅपडील साईटवरूनही अवैधपणे औषधविक्री सुरू असल्याची माहिती ‘एफडीए’ला मिळाली. संबंधित औषधविक्रेत्याने स्नॅपडीलकडे औषधांची मागणी नोंदविली होती. त्याने केलेल्या मागणीनुसार औषधे वेळेत घरपोच मिळाली. विशेष म्हणजे व्यवहारादरम्यान कंपनीने त्यांच्याकडे प्रिस्क्रिप्शनची मागणी केली नव्हती. औषध दुकानदाराच्या तक्रारीनंतर ‘एफडीए’नेही शहानिशा केल्यानंतर तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार स्नॅपडील आणि अॅमेझॉन साईटवरूनही औषधांची विक्री होत असल्याचे उघड झाले. त्यानुसार तत्काळ कंपनीच्या बंगळुरू येथील मुख्यालयाला नोटीस पाठवून औषध विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
दोन महिन्यांपासून विक्री : दोन महिन्यांपासून आॅनलाइन शॉपिंग साईट्सवर औषध विकण्याचा ट्रेण्ड सुरू झाला. परवान्याशिवाय, प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकणे गंभीर गुन्हा आहे. जनतेच्या आरोग्यासाठी अशाप्रकारे विक्री करणे घातक ठरू शकते. हे लक्षात घेऊन औषध विक्रेत्यांनी आणि ग्राहकांनीही आॅनलाइन औषध खरेदी टाळावी, असे आवाहन ‘एफडीए’ने केले आहे.