Join us  

Mumbai Metro: १९ हजार कोटी रुपयांचे तीन नवे मेट्रो प्रकल्प मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 1:46 AM

कल्याण-डोंबिवली ही शहरे नवी मुंबईला जोडण्याची गरज, त्यासाठी परिवहन सेवांची आवश्यकता या सगळ्या बाबी लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे

मुंबई : मुंबईतील मेट्रो रेल्वेचे जाळे आणखी विस्तारत १९ हजार कोटी रुपये खर्चाच्या तीन नव्या मेट्रो प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. त्यात गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड (४४७६ कोटी रुपये), वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (८७३९ कोटी) आणि कल्याण ते तळोजा (५८६५ कोटी) या प्रकल्पांचा समावेश आहे.

गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास मंजुरी देण्यात आली. या मार्गाची एकूण लांबी ९.२०९ किमी आहे. यापैकी ८.५२९ किमी उन्नत तर ०.६८ किमी भुयारी मार्ग आहे. यामध्ये एकूण ४ उन्नत स्थानके असतील. प्रकल्पाची किंमत सुमारे ४ हजार ४७६ कोटी रुपये इतकी आहे. मार्च २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पासाठी एमएमआरडीए व राज्य सरकार यासह आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे अर्थसाहाय्य घेण्यासाठीही मान्यता देण्यात आली. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रारंभी १४ लाख ३२ हजार दैनंदिन प्रवासी सीएसएमटी-वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख-शिवाजी चौक (मीरा रोड) या मार्गाचा वापर करण्याची शक्यता असून २०३१ पर्यंत ही संख्या २१ लाख ६२ हजार होईल, असा अंदाज आहे. ठाणे-घोडबंदर परिसरातील वाढत्या नागरीकरणाला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबई, बोरीवली, मीरा-भाईंदर, ठाणे ही शहरे जोडली जाऊन मेट्रोचे वर्तुळ पूर्ण होईल आणि वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल.वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई मेट्रो मार्ग-११) या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास मंजुरी देण्यात आली. वडाळा ते सीएसएमटी मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण मेट्रो मार्गिका म्हणजे सीएसएमटी-वडाळा-कासारवडवली-गायमुख या प्रकल्पावर प्रारंभी ११ लाख ६० हजार दैनंदिन प्रवासी या मार्गाचा वापर करतील, असा अंदाज आहे.

कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाच्या (मुंबई मेट्रो मार्ग १२) सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणीस मंजुरी देण्यात आली. या मार्गाची एकूण लांबी २०.७५ किमी असून हा संपूर्ण उन्नत मार्ग असेल. यामध्ये एकूण १७ स्थानके असतील. या प्रकल्प पूर्णत्वाची किंमत सुमारे ५ हजार ८६५ कोटी रुपये इतकी आहे. मार्च २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

कल्याण-डोंबिवली या शहरांची वाढती लोकसंख्या व आजूबाजूला होणारा विकास, २७ गावांचा विकास आराखडा, कल्याण ग्रोथ सेंटर, नैना क्षेत्र, कल्याण-डोंबिवली ही शहरे नवी मुंबईला जोडण्याची गरज, त्यासाठी परिवहन सेवांची आवश्यकता या सगळ्या बाबी लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे. परिणामी, या मार्गामुळे कल्याण, तळोजा, नवी मुंबई, नवी मुंबई विमानतळ या क्षेत्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मेट्रो ५ ठाणे-भिवंडी-कल्याण, नवी मुंबई मेट्रो मार्ग आणि मेट्रो १२ कल्याण ते तळोजा यांचे एकात्मीकरण करण्याचेदेखील प्रस्तावित आहे. यामुळे प्रवाशांना सुलभ प्रवास करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :राज्य सरकारमेट्रो