रिक्षाचालकाने परत केले तीन तोळ्याचे दागिने
By Admin | Updated: December 24, 2014 09:22 IST2014-12-23T23:14:24+5:302014-12-24T09:22:23+5:30
डोंबिवलीतील रिक्षा मध्ये विसरलेले ३३ गॅ्रम सोन्याचे दागिने व रोकड रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे परत केल्याची दुर्मीळ घटना मंगळवारी पश्चिम परिसरात घडली

रिक्षाचालकाने परत केले तीन तोळ्याचे दागिने
नांदिवली - डोंबिवलीतील रिक्षा मध्ये विसरलेले ३३ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोकड रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे परत केल्याची दुर्मीळ घटना मंगळवारी पश्चिम परिसरात घडली. रवींद्र दुबे असे या रिक्षा चालकाचे नाव आहे.
पश्चिमेतील देवी चौक परिसरात राहणा-या शैलजा दामोदर परब यांनी घरी जाण्यासाठी स्टेशन जवळून रिक्षा केली. त्यावेळी त्यांच्या हातात असलेली पिशवी रिक्षाच्या मागील बाजूस ठेवली होती. रिक्षातून उतरल्यानंतर पिशवी रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पिशवीत सोनेचे दागिने व पैसे असल्याने त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तत्काळ विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दरम्यान दागिने असलेली पिशवी रिक्षा चालक रवींद्र दुबे याला रिक्षा पुसत असताना दिसून आली. तेव्हा त्यांनी आपली रिक्षा युनियनच्या कार्यालयात नेली. त्यांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा रिक्षा चालक मालक युनियनचे पदाधिकारी शेखर जोशी, विश्वंभर दुबे, आणि कैलास यादव यांनी रिक्षा चालक रवींद्र यांचे कौतुक करून ही पिशवी विष्णू नगर पोलीस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी परब यांना बोलावून ती पिशवी व त्यातील ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पैसे परत केले. पोलीस व परब यांनी रवींद्र या प्रामाणिक रिक्षा चालकाचे कौतुक केले. (वार्ताहर)