राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या अन्य तीन मेट्रो मार्गांमुळे मुंबई, मीरा-भाईंदर, ठाणे, नवी मुंबई ही शहरे जोडली जाऊन मेट्रोचे वर्तूळ पूर्ण होईल आणि वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल. या प्रकल्पांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व राज्य सरकार यासह आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे अर्थसाह्य घेण्यासाठीही राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची प्राधिकरणा मार्फत अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.मीरा-भार्इंदरमधील गायमुख ते शिवाजी चौक हा मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला १४ लाख ३२ हजार दैनंदिन प्रवासी सीएसएमटी-वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख-शिवाजी चौक (मीरा रोड) या मार्गाचा वापर करतील, असा अंदाज आहे. वेगाने विकसित होत असलेल्या ठाणे-घोडबंदर परिसरातील वाढत्या नागरीकरणाला या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा मेट्रो प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास व राज्य सरकार यांच्या सहकार्यातून पूर्ण केला जाईल. जागतिक बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था इत्यादी आंतरदेशीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्जसाह्य घेणे या बाबींना मंजुरी देण्यात आली आहे. या मेट्रो मार्गांचा फायदा मुख्यत्वाने मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पुनर्विकसित होणाऱ्या क्षेत्राला होणार आहे. हा मार्ग घड्याळ गोदी, मुंबई जनरल पोस्ट आॅफिस व मुंबई महानगरपालिका या ऐतिहासिक वारसा इमारतींच्या जवळून, मात्र भूमिगत स्वरूपात जाणार आहे. हे पाहता मुंबई पुरातन वारसा जतन समितीकडून (मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी) लवकरात लवकर मंजुरी देण्याची शिफारसही मान्य करण्यात आली आहे. वडाळा ते सीएसएमटी मेट्रो प्रकल्प हा मेट्रो मार्ग ४ (वडाळा ते कासारवडवली) आणि ४ अ (कासारवडवली ते गायमुख) यांचा दक्षिणेकडे विस्तारित होणारा भाग आहे. वडाळा ते सीएसएमटी प्रकल्पामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट पुनर्विकसित परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच सीएसएमटी हे थेट ठाणे-घोडबंदर व मीरा-भार्इंदरला जोडले जाणार आहे. त्यासोबत मेट्रो ३ चे सीएसएमटी स्थानक, हार्बर रेल्वेचे शिवडी स्थानक आणि मोनारेलचे भक्ती पार्क स्थानक येथे प्रवाशांना मार्ग अदलाबदल करणे सहज शक्य होणार आहे.
तीन मेट्रो मार्गांमुळे मेट्रोचे वर्तूळ पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 05:20 IST