मुंबई - शहरात जवळजवळ तीन लाख रिक्षा आणि ३० हजारांहून अधिक टॅक्सी असून, त्या उभ्या करण्यासाठी पुरेसे स्टँड नसल्याचे युनियनचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरात नवीन स्टँड उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे स्वाभिमान रिक्षा टॅक्सी युनियन कृष्णकुमार तिवारी यांचे म्हणणे आहे.
मुंबई शहरातील जुन्या स्टँडच्या जागा शहर विकासात नाहीशा झाल्या आहेत, तर नव्या स्टँडची उभारणी अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर कुठेही उभ्या केल्या जात असून, त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होत आहे.
मुंबईतील उपनगर परिसरामध्ये २५० हून शेअर ऑटो रिक्षाचे स्टँड असून त्यापैकी १५२ स्टँड पश्चिम रेल्वे, तर ११३ स्टँड मध्य रेल्वेच्या स्थानकांबाहेर आहेत. मात्र, रिक्षांच्या तुलनेत ही संख्या अपुरी आहे. शेअर ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्या ३५ टक्के महिला प्रवाशांसाठी हे स्टँड खूप महत्त्वाचे आहेत. मात्र, स्टँड नसल्याने अनेक वेळा प्रवाशांची गैरसोय होत असल्याने या प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ताण आणि उपाययोजनास्टँडअभावी वाहतुकीवर प्रचंड ताण येत असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. यावर उपाय म्हणून नव्या स्टँडसाठी जागा निश्चित करणे, रेल्वे आणि मेट्रो स्टेशन बस डेपो, आणि बाजार परिसरात अधिक स्टँड उभारणे तसेच प्रवासी आणि वाहनचालकांसाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
निवेदने, प्रस्तावांकडे दुर्लक्ष नवीन स्टँडसाठी शहरातील रिक्षा-टॅक्सी संघटनांनी वारंवार प्रशासनाला निवेदने आणि प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. वाहतूक पोलिस, महापालिका आणि आरटीओ या सर्व यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे.