मुंबईतील झवेरी बाजारात इमारत कोसळून तीन मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 05:55 IST2017-12-16T05:55:00+5:302017-12-16T05:55:00+5:30
झवेरी बाजारातील चिप्पी चाळीच्या म्हाडाच्या सेस (उपकर प्राप्त) इमारत क्रमांक ५०/५२ चा अर्धा भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. रिकामी इमारत पाडण्याचे काम सुरू असताना झालेल्या या अपघातात तीन मजूर मृत्यूमुखी पडले. अन्य एक मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबईतील झवेरी बाजारात इमारत कोसळून तीन मजूर ठार
मुंबई : झवेरी बाजारातील चिप्पी चाळीच्या म्हाडाच्या सेस (उपकर प्राप्त) इमारत क्रमांक ५०/५२ चा अर्धा भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. रिकामी इमारत पाडण्याचे काम सुरू असताना झालेल्या या अपघातात तीन मजूर मृत्यूमुखी पडले. अन्य एक मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत या मजूराचा शोध सुरू होता.
पुनर्विकासासाठी गेलेल्या या इमारतीत तळमजला अधिक चार मजले आहेत. दुर्घटना घडली, तेव्हा १५ मजूर घटनास्थळी कार्यरत होते. इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच, जीव वाचवत मजूर येथून पळाले. चौथ्या मजल्यावर एकूण दहा मजूर कार्यरत होते. त्यापैकी सात कामगार सुखरूप बाहेर पडले. तर पहिल्या मजल्यावर सहा कामगार कार्यरत होते. येथील पाच कामगार जीव मुठीत घेऊन पळाले. ढिगारा उपसताना फिरोज वाब खान (२३), सफारूल्लाक (२२) आणि रॉकी शेख (२२) या तीन मजूरांचे मृतदेह सापडले. त्यामुळे एका बेपत्ता कामगाराच्या शोधासाठी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. चिंचोळ्या गल्ल्यांमुळे बचावकार्यात अडथळा येत होता.