तीन कोटींचा गंडा घालणारे जेरबंद

By Admin | Updated: April 27, 2015 22:35 IST2015-04-27T22:35:13+5:302015-04-27T22:35:13+5:30

गृहकर्जाच्या नावाखाली बँकेला ३ कोटी २८ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या तिकडीला अटक करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे.

Three hundred crores worth of zirband | तीन कोटींचा गंडा घालणारे जेरबंद

तीन कोटींचा गंडा घालणारे जेरबंद

पनवेल : एका मोठ्या कंपनीचे मालक असल्याचे सांगून, बँकेच्या अधिकाऱ्यांशी ओळख वाढवून गृहकर्जाच्या नावाखाली बँकेला ३ कोटी २८ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या तिकडीला अटक करण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. २०१० साली हा प्रकार खारघरमधील आंध्रा बँकेत घडला होता.
एव्हरशाईन फार्मासेन या कंपनीचे आपण मालक असल्याची बतावणी करीत आरोपी कुमार कुंजर (३६) याने बँक व्यवस्थापकाला सदर कंपनीत काम करणाऱ्या २८ कामगारांचे बनावट खाते उघडून अठरा ते वीस हजार रु पये मासिक पगार बँकेतून जात असल्याचे दाखविले. यासाठी आरोपीने मोठी रक्कमही कंपनीच्या बँक खात्यावर जमा केली.
कंपनीच्या कामामुळे काही सरकारी कार्यालयात ओळखी असल्याने त्याने काही सरकारी कार्यालयाच्या कोटी रु पयांच्या ठेवीही बँकेला मिळवून दिल्याने कुमार हे बडे उद्योजक असल्याची बँकेत ओळख निर्माण झाली.
बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी ओळख वाढल्याने कुंजरने डाव साधत कंपनीत अल्प पगारात काम करणाऱ्या कामगारांच्या घरासाठी कर्जाचा प्रस्ताव शाखा व्यवस्थापकाकडे ठेवला. त्याचा तो डाव यशस्वीही झाला. बँकेकडून होकार मिळताच त्यांनी नेरूळ येथील बिल्डर भास्कर डेअर आणि रामकृष्ण शेट्टी यांच्या संगनमताने नेरूळमधील बांधकाम सुरु असलेली लीलाबाई निवास ही इमारत दाखवून प्रति व्यक्ती दहा लाख अशी एकूण २ कोटी ८० लाख रुपये एवढे गृहकर्ज मिळविले, तसेच नेरूळमधील एका हॉटेलचे मालक भास्कर शेट्टी यांचा बंगला ४५ लाख २० हजार रुपयांना खरेदी केल्याचे सांगून बँकेतून गृहकर्ज मंजूर करून व त्यांच्या नावे बनावट खाते उघडून या तिघांनी ३ कोटी २८ लाख २० हजार रु पये उकळले.
कुंजर ही मोठी असामी असल्याची खात्री पटल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांनी गृहकर्जाचे अहवाल सादर करणाऱ्या सुमित एजन्सीवर भरोसा ठेवून कोणतीही खातरजमा न करता गृहकर्ज मंजूर करून धनादेश सुपूर्द केला. यानंतर बँकेतून गृहकर्ज वसुलीसाठी अनेक वेळा पत्र पाठवूनही कुंजर पैसे भरणा करीत नसल्याने बँकेने चौकशी केली असता सदर इमारतीत वेगळेच कुटुंब राहत असल्याचे आढळून आले. त्या कुटुंबांनी या बँकेकडून कोणतेही कर्ज घेतले नसल्याचे समोर येताच कुंजर याने बँकेला गंडा घातल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे सर्व प्रकार उघडकीस आले.
या प्रकरणी तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शिंदे म्हणालेकी, डेअर आणि शेट्टी यांनी धनादेश वटवून बँकेची फसवणूक केली आहे. यातील आरोपी नवीनकुमार कुंजर याला बंगळूर येथून तर डेअर आणि शेट्टी या दोघांना नेरूळ येथून अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. कर्ज देताना बँकेने जागेची खातरजमा केली नसल्यामुळे आरोपींनी त्यांचा डाव साधला असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

खारघर पोलिसांत तक्रार
एका कंपनीचे मालक असल्याचे सांगून कंपनीतील २८ कामगारांचे बनावट खाते उघडले
अठरा ते वीस हजार रु पये मासिक पगार बँकेतून जात असल्याची बतावणी
बँक कर्मचाऱ्यांशी ओळख वाढवून मिळवले गृहकर्ज; कर्जाचा हप्ता देण्यास टाळाटाळ

Web Title: Three hundred crores worth of zirband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.