खालापुरमध्ये तीन घरफोड्या
By Admin | Updated: January 15, 2015 22:51 IST2015-01-15T22:51:59+5:302015-01-15T22:51:59+5:30
खालापूर तालुक्यात पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नुकतीच उसरोळी भोकरपाडा येथे एका दुकानासह दोन घरफोड्या करून ८८ हजारांची रोकड घेवून पलायन केले.

खालापुरमध्ये तीन घरफोड्या
वावोशी : खालापूर तालुक्यात पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नुकतीच उसरोळी भोकरपाडा येथे एका दुकानासह दोन घरफोड्या करून ८८ हजारांची रोकड घेवून पलायन केले.
खालापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी खालापूर तालुक्यातील खेडेगावात आपला मोर्चा वळवला असून मंगळवारी उसरोली भोकरपाडा या गावातील तीन ठिकाणी दुकानासह दोन घरांना लक्ष्य केले. येथील अरुण पांडुरंग ढोकले यांच्या दुकानाच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून दुकानातील पत्र्याची तिजोरी फोडून ८० हजारांची रोकड पळवली तर महादू अंबाजी ढोकले या घरातील ८ हजार तसेच नरेश महादू पाटील यांच्या नवीन घरात चोरटे घुसले परंतु या ठिकाणी त्यांच्या हाताला काहीच लागले नसल्याने दोन ठिकाणाचे ८८ हजार रुपये घेवून अज्ञात चोरट्याने पलायन केले. यातील अरुण ढोकले यांनीच पोलिसात तक्रार केली आहे. या चोरीची खालापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बुधवारी मध्यरात्री नागोठणे परिसरात एकाच रात्री १२ घरफोड्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. आता खालापुरातही घरफोड्यांचे सत्र सुरू झाले असून चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)