Join us

एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 06:31 IST

८७ वर्षीय आत्माराम चव्हाण १९५६ साली कोकणातून मुंबईत आले आणि देवदत्त व्यायाम शाळेचे सदस्य झाले.

सुजित महामुलकर 

मुंबई : महाराष्ट्राची अनन्यसाधारण असलेली गोविंदा परंपरा जपण्याचा लालबागच्या चव्हाण कुटुंबीयांचा अट्टाहास मुंबईकरांसाठी एक अनोखा आदर्श ठरतो आहे. या कुटुंबाच्या तीन पिढ्यांतील सहा सदस्य आज देवदत्त गोविंदा पथकात सहभागी झाले असून, लोकपरंपरेचा हा कौटुंबिक प्रवास प्रेरणादायी आहे.

८७ वर्षीय आत्माराम चव्हाण १९५६ साली कोकणातून मुंबईत आले आणि देवदत्त व्यायाम शाळेचे सदस्य झाले. तिथूनच व्यायामासह गोविंदा प्रवासाला सुरुवात झाली. त्यांची तीनही मुले रवींद्र (५५), राम (५३) आणि सुरेंद्र (५०) यांनी लहानपणापासूनच पथकात भाग घेतला. त्यांच्या पुढची पिढीही आता मागे नाही. रवींद्र यांचा मुलगा आर्य (१८) आणि राम यांचा मुलगा विवान (८) हेदेखील आता अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या थरात  महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.या पथकात ६५ वर्षीय शिवाजी परबही गेली ४५ वर्षे खालच्या थराचे आधारस्तंभ राहिले आहेत. ते सध्या व्यायामशाळेचे व्यवस्थापनही पाहतात. ‘यंदा आमच्या व्यायामशाळेचे ९५ वे वर्ष आहे, सरावाला मोठी गर्दी दिसत नसली, तरी दहीहंडीच्या दिवशी ३००-३५० सदस्य पथकात सहभागी होतात,’ असे परब सांगतात.

जेन-एक्स, झेड, अल्फा एकत्रकामानंतर रात्री उशिरापर्यंत सराव करणाऱ्या गोविंदांचा उत्साह आजही जिवंत आहे. आता जेन-एक्स, झेड आणि अल्फा पिढ्या एकत्र गोविंदा पथकात सहभागी झाले आहेत, हीच या परंपरेची ताकद आहे, असे राम यांनी सांगितले.

जुन्या आठवणींना उजाळाआत्माराम चव्हाण काही काळ या पथकाला ‘मास्तर’ म्हणूनही प्रशिक्षण देत असत. आता त्यांचा मुलगा राम चव्हाण याच्याकडे ती जबाबदारी आहे. इतक्या लहान नातवंडाना हंडीच्या थराला बघून भीती नाही का वाटत, असे विचारले असता, आत्माराम चव्हाण म्हणाले, बजरंग बली आमच्या पाठीशी आहे. त्याच्यावर विश्वास आहे.

सगळ्यांनी जर भीती बाळगली, तर आपली संस्कृती, परंपरा टिकणार कशी? पूर्वी बैलगाडी, त्यावर राधा, कृष्णाच्या पेहरावात चित्ररथ काढला जायचा. 

लेझीम पथक, लाठ्याकाठ्या खेळ करत लालबाग ते चुनाभट्टीपर्यंत पथकातील स्वयंसेवत चालत जात असत, अशी आठवणही चव्हाण यांनी सांगितली. 

टॅग्स :मुंबई