एक लाखाच्या बक्षिसासाठी मेंढ्यांच्या झुंजी
By गौरी टेंबकर | Updated: April 4, 2026 15:30 IST2026-04-04T15:30:10+5:302026-04-04T15:30:23+5:30
मास्टर आणि कुरेशी व अन्य काहीजण दोन मेंढ्यांमध्ये झुंज लावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे

एक लाखाच्या बक्षिसासाठी मेंढ्यांच्या झुंजी
मुंबई : एक लाख रुपयांच्या बक्षिसासाठी मेंढ्यांच्या झुंजी लावून त्यांना क्रूर वागणूक दिल्याचा प्रकार जोगेश्वरी पश्चिमेत घडला आहे. याप्रकरणी प्राणी मित्र संघटनेच्या लेखी तक्रारीवरून मेंढी मालकासह तिघांविरोधात दि. २ एप्रिलला आंबोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. साजिद अब्दुल लतीफ सैयद, सौद फिरदौस मास्टर आणि इम्रान मोहम्मद अली कुरेशी अशी आरोर्पीची नावे आहेत.
अंबोली पोलिस ठाण्याचे अंमलदार विलास दुलम यांच्या माहितीनुसार, 'पेटा इंडिया'च्या क्रूरता प्रतिसाद विभागाच्या सहयोगी व्यवस्थापक सलोनी साकरिया यांनी अंबोली पोलिस ठाण्यात २४ मार्चला तक्रार दिली. त्यात जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान जोगेश्वरी पश्चिमेकडील रावजी मैदान येथे काहीजण मेंढ्यांच्या झुंजी लावत होते. त्याचे स्थानिक वृत्तवाहिनीने प्रसारित केलेले चित्रीकरण साकरिया यांनी पोलिसांना दाखविले.
स्पर्धा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी
मास्टर आणि कुरेशी व अन्य काहीजण दोन मेंढ्यांमध्ये झुंज लावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावेळी झुंज पाहण्यासाठी नागरिकही उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक सुशांतकुमार पाटील यांच्या समवेत स्पर्धेच्या ठिकाणी चौकशी केली असता ते अंबोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट झाले.
दोन मेंढ्यांची वांद्रे येथून सुटका
ऑगस्ट २०२५ मध्येही वांद्रे टर्मिनस येथील जवळच्या मैदानात मेंढ्यांच्या झुंजी लावण्यात आली होती. स्थानिक वाटसरूने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन मेंढ्यांची सुटका केल्याचे 'पेटा'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्पर्धेबाबत गोपनीयता कायम
मनोरंजन आणि पैशासाठी मुंबईत श्वान, कोंबडे, मेंढ्यांच्या झुंजी लावल्या जातात. सहसा पोलिस पोहोच शकत नाहीत, अशा परिसरात त्या भरवल्या जातात. प्राण्यांच्या झुंजी लावणे हा गुन्हा आहे, याची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली जात नाही. या झुंजीसाठीच प्राण्यांना पोसले जाते आणि तो खर्च वसूल करण्यासाठी अशा स्पर्धा घेतल्या जातात असे 'पेटा'चा अधिकारी म्हणाला.
'चमकीला' विरुद्ध 'रॉकी'; रंगली काट्याची टक्कर
मेंढ्यांच्या झुंजीबाबत मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांना ई-मेलद्वारे तक्रार दिली. मात्र, जोगेश्वरी परिसर बराच मोठा असल्याने सुरुवातीला ओशिवरा पोलिसांकडे हा प्रकार वर्ग झाला. पोलिसांनी शोध घेत जवळपास तीन आठवड्यांनी हे प्रकरण अंबोली पोलिसांच्या हद्दीत असल्याचे सांगितले. आम्ही चौकशी केल्यावर 'चमकी'ला आणि 'रॉकी' नावाच्या मेंढ्यांची झुंज लावण्यात आली. विजेत्या मेंढ्याच्या मालकास एक लाखाचे बक्षीस होते. 'चमकी'ला मेंढा जिंकला तर 'रॉकी' याचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळाली. त्यामुळे आता आम्ही जिवंत मेंढ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहोत, असे 'पेटा इंडिया'च्या सलोनी साकारिया यांनी सांगितले.