Join us  

खासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 5:53 PM

खासदार उदयनराजे यांच्या नावेही धमक्या आल्या आहेत, असे मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. 

मुंबई: उच्च न्यायालयाबाहेर झालेला हल्ला माझ्यावर नाही तर हा हल्ला  लोकशाहीवर करण्यात आला आहे. मला फोनवरुन हजारो धमक्या देण्यात आल्या. यामध्ये खासदार उदयनराजे यांच्या नावेही धमक्या आल्या आहेत, असे मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. 

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज दुपारी उच्च न्यायालयाबाहेर हल्ला करण्यात आला.  हल्ला करणाऱ्या वैजनाथ पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैजनाथ पाटील हा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे. दरम्यान, याविषयी बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, मला फोनवरुन हजारो धमक्या देण्यात आल्या. यामध्ये खासदार उदयनराजे यांच्या नावेही धमक्या आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, आज झालेल्या हल्ल्यावरुन असे लक्षात येते की, तक्रारीकडे पोलिसांनी कानाडोळा आहे. पोलिसांनी लवकर कारवाई केली असती तर हा हल्ला झाला नसता. तसेच, खासदार उदयनराजेंच्या नावाने धमकीचे फोन येत असल्यामुळे त्यांचे नाव तक्रारीत दाखल केले आहे. कारण, खासदार उदयनराजे मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत, असे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

याचबरोबर ते म्हणाले, उच्च न्यायालयाबाहेर माझ्यावर झालेल्या हल्ल्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून चिंता व्यक्त केली आहे. तसेच सुरक्षा देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास असून मी घाबरत नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे, असेही अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. 

सरकारने 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सदावर्ते यांनी याचिका दाखल केली असून आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार का, या प्रश्नावर मंथन सुरू असतानाच याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेवर आता न्यायालय काय निकाल देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आजच राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला संरक्षण मिळाले असून राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायालयाकडून या आरक्षणाला स्थगिती देता येणार नाही.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. विधिमंडळात मराठा समाज आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. तर, राज्यपालांनी सही केल्यानंतर 1 डिसेंबरपासून राज्यात मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा लागू झाला आहे. मात्र, मराठा समजाला मिळाले आरक्षण न्यायालयात टिकणार का? असा प्रश्न सर्रास विचारला जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरक्षण कोर्टात टिकेल, असा दावा केला आहे. तरीही मराठा आरक्षणाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

सदावर्तेंवर हल्ला करणारा नक्की आहे तरी कोण?गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज वैजनाथ नावाच्या व्यक्तीनं हल्ला केला आहे. वैजनाथ पाटील ही व्यक्ती जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा गावात वास्तव्याला आहे. मागील चार महिन्यांपासून तो पुण्यात नोकरी शोधत होता. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून, आई-वडील शेतकरी आहेत.  

टॅग्स :मराठा आरक्षणउदयनराजे भोसलेवकिल