मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विधानभवनची इमारत बॉम्बने उडविण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याने गुरुवारी विधानभवन परिसरात खळबळ उडाली. मुंबई उच्च न्यायालय, बीएसई व मेट्रो रेल्वेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी त्यात होती.
धमकीचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटून याप्रकरणी सरकारने निवेदन देण्याची मागणी करण्यात आली. तर धमकीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने विधानभवन परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. परिसरात अभ्यगतांच्या प्रवेशावर गुरुवारी निर्बंध आणले होते. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज या माहितीला दुजोरा दिला.
बॉम्ब, क्षेपणास्त्राचा मेलमध्ये उल्लेख
आज सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी विधानभवनाच्या अधिकृत ई -मेलवर धमकी देण्यात आली. अशी धमकी देणाऱ्या ई -मेलचा संबंध खलिस्तान समर्थकांशी असू शकतो. मात्र, यावर तातडीने भाष्य केल्यास ते घाई केल्यासारखे होईल. या मेलमध्ये बॉम्ब आणि क्षेपणास्त्राचा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यावरच अधिकची माहिती देणे संयुक्त होईल, असे प्रा. शिंदे यांनी सांगितले.
ई-मेल येतात कोठून?
धमकीचा ई-मेल गुरुवारी सकाळी प्राप्त होताच मुंबई पोलिस, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, श्वानपथकाने घटनास्थळी धाव घेतली. या तिन्ही इमारती रिकामी करून तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळून आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ई-मेल नेमका कोठून आला आणि त्याचा आयपी ॲड्रेस काय आहे, याचा शोध मुंबई पोलिसांचे सायबर सेल घेत आहे.