Join us

Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 07:02 IST

Mumbai Police: व्हॉट्सअॅपवर धमकी संदेश; मुंबई पोलिस अलर्ट मोडवर

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन सुरू असतानाच, भारतात १४ पाकिस्तानी अतिरेकी तब्बल ४०० किलो आरडीएक्स घेऊन घुसले असून, मुंबईत मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट घडवून आणणार, अशा धमकीचा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप नंबरवर आल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या संदेशाची पोलिसांकडून तपासणी सुरू असून, गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या धमकी संदेशात भारतात १४ पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचा दावा करण्यात आला असून, हे अतिरेकी मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये ४०० किलो आरडीएक्सचा वापर केला जाईल आणि त्यातून सुमारे १ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असेही या धमकीच्या संदेशात म्हटले आहे.

संदेशात 'लष्कर-ए-जिहादी' नावाच्या कथित दहशतवादी संघटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. हा संदेश नेमक कोणी पाठवला आहे, याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या संदेशाबाबत पोलिस मुख्यालय, राज्य दहशतवाद विरोध पथक, सायबर सेल आणि गुप्तचर यंत्रणांना माहिती देण्यात आली असून, सर्व यंत्रणांकडून याबाबत तपास सुरू आहे.

अफवांवर विश्वास नकोपोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाल किंवा वस्तू दिसल्यास पोलिस हेल्पलाइन, तसेच जवळच्या पोलिस ठाण्याला माहिती देण्याचे आवाहन केले.

धमक्यांचे सत्र नवे नाहीगेल्या काही दिवसांपासून धमकीचे, खोट्या कॉलचे सत्र सुरूच आहे. बहुतांश प्रकरणात दारूच्या नशेत, मानसिक रुग्ण वा रागातून खोटे कॉल केले गेले.काही दिवसांपूर्वी वरळी येथील हॉटेल फोर सीझनमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला होता. १४ ऑगस्ट रोजी एका ट्रेनमध्ये स्फोटाची धमकी आली होती. या सर्व प्रकरणांत तपासाअंती कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नव्हती.

टॅग्स :मुंबई पोलीसगणेश विसर्जन