मुंबईत अतिसाराचे हजार बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:55 IST2019-09-25T00:55:07+5:302019-09-25T00:55:10+5:30
चार वर्षांची आकडेवारी; प्रजा संस्थेच्या अहवालातील माहिती

मुंबईत अतिसाराचे हजार बळी
मुंबई : प्रजा संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणातून २०१८ या वर्षात ९९ हजार ४४४ अतिसाराच्या रुग्णांची शहर उपनगरात नोंद करण्यात आली असून २०१४-१८ या चार वर्षांच्या कालावधीत मुंबईतील पालिका व सरकारी रुग्णालयांत पाच लाख ३८ हजार २६१ जणांना अतिसाराची लागण तर १ हजार ८ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे.
दूषित पाणी किंवा अन्नपदार्थांच्या सेवनामुळे अतिसार हा आजार होतो. पावसाळ्यात मुख्यत: या आजाराच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येते. या कालावधीत जीवाणूंच्या संक्रमणामुळे या आजाराचा प्रसार होतो. पोटात दुखणे, मळमळ होणे, जुलाब होणे, उलट्या अशी लक्षणे दिसू लागतात. या अहवालानुसार, २०१४ च्या तुलनेत २०१८ मध्ये शहर, उपनगरात जलजन्य आजारांचा धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
२०१८ साली कुर्ला विभागात सर्वाधिक अतिसाराचे ११ हजार ५०५ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल दादर, प्रभादेवी परिसरात सात हजार ९०८ आणि भांडुपमध्ये ६ हजार ३२८ रुग्णांची नोंद झाली आहे. प्रजा संस्थेच्या अहवालानुसार, एकूण रुग्णांपैकी केवळ ८ टक्के रुग्णांचे निदान पालिका रुग्णालयांत झाले असून ८९ टक्के रुग्णांचे निदान दवाखान्यांत झाले आहे. याविषयी डॉ. रोहित कºहाडे म्हणाले की, दूषित पाणी - बर्फ आणि उघड्यावरच्या पदार्थांमुळे हा आजार अधिक बळावतो. त्यामुळे स्वच्छ, ताजे अन्न आणि पाणी मुंबईकरांच्या स्वास्थ्यासाठी उत्तम आहे.
वर्ष रुग्णसंख्या मृत्यू
२०१४ १,१९,२४८ २६२
२०१५ १,१८,४४६ १६९
२०१६ १,०४,९२३ ३४०
२०१७ ९६,२०० २२५
२०१८ ९९,४४४ १२
एकूण ५,३८,२६१ १,००८