Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीएमसीनंतर आणखी एक मोठा घोटाळा?; हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये बुडण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 10:10 IST

मालक फरार झाल्याची शक्यता; पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळ्यानंतर आणखी एक मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुडविन ज्वेलर्सची दुकान बंद असल्यानं हजारो लोकांची अवस्था बिकट झाली आहे. अनेकांनी गुडविनच्या योजनांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र ज्वेलर्सचे मालक सुनील कुमार आणि सुधीश कुमार यांनी गेल्या चार दिवसांपासून दुकानं बंद ठेवली आहेत. 'टाईम्स ऑफ इंडिया'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.हजारो लोकांनी गुडविन ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानं पोलिसांनी चौकशीसाठी सुनील आणि सुधीश यांचं डोंबिवलीतलं घर गाठलं. मात्र त्यांचं घर बंद होतं. त्यामुळे ते दोघे फरार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुडविनची शोरुम्स सील केली आहेत. सुनील, सुधीश केरळचा रहिवासी असून त्याची मुंबई, पुण्यात जवळपास 13 आऊटलेट्स आहेत. गुडविन समूहाच्या संकेतस्थळावर सुनील कुमार यांची माहिती उपलब्ध आहे. सुनील कुमार कंपनीचे अध्यक्ष असून सुधीश व्यवस्थापकीय संचालक आहेत.गुडविनच्या योजनांमध्ये 2 हजार ते 50 लाखांपर्यंतची गुंतवणूक केल्याचा ग्राहकांचा दावा आहे. ग्राहकांनी केलेली गुंतवणूक कोटींच्या घरात असू शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 'आम्ही दुकानाचे मालक आणि विभाग व्यवस्थापक मनीष कुंडी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे,' अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. पी. अहेर यांनी दिली. या प्रकरणी आतापर्यंत केवळ डोंबिवलीतल्या 250 ग्राहकांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. गुडविनमधली एकूण गुंतवणूक किती, याची मोजदाद करण्यासाठी सध्या ग्राहकांचे जबाब नोंदवले जात आहेत. या प्रकरणी दुकानाच्या मालकांशी संपर्क साधला असता, त्यांचे मोबाईल फोन स्विच्ड ऑफ होते. दरम्यान एका व्हॉईस मेसेजमधून कंपनीच्या अध्यक्षांनी ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळतील, असा विश्वास त्यांनी मेसेजमधून व्यक्त केला आहे.  

टॅग्स :पीएमसी बँक