हजारो अवैध रिक्षा वैध करणार
By Admin | Updated: June 16, 2015 04:03 IST2015-06-16T04:03:52+5:302015-06-16T04:03:52+5:30
राज्यातील १ लाख ५६ हजार अवैध रिक्षा लवकरच वैध ठरणार आहेत.

हजारो अवैध रिक्षा वैध करणार
मुंबई : राज्यातील १ लाख ५६ हजार
अवैध रिक्षा लवकरच वैध ठरणार
आहेत. परवान्यांचे नूतनीकरण न
केल्याने अवैध ठरलेल्या रिक्षांपैकी
बव्हंशी आजही रस्त्यावर फिरतात.
अशा रिक्षांना वैध करून दिलासा
देण्याचा प्रयत्न असल्याचे परिवहन
मंत्री दिवाकर रावते यांनी आज
पत्रपरिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, नूतनीकरणासाठी शुल्काबाबत सवलत देऊन हे परवाने वैध केले जातील. त्यासाठी एकदाच संधी दिली जाईल. हजारो तरुण या व्यवसायात आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.
नवीन टॅक्सी-रिक्षा परवाने देण्याची बाब विचाराधीन असल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
टॅक्सी संपाला मुंबईत संमिश्र प्रतिसाद
मोबाइल अॅप्सवर चालणाऱ्या खासगी टॅक्सी सेवांवर बंदी घालावी, अशी मागणी करत स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा युनियनतर्फे सोमवारी मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला शहर आणि उपनगरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमध्ये सहभागी होण्यासाठी टॅक्सी चालकांवर जबरदस्ती केली जात होती. त्यासाठी तब्बल १५0 टॅक्सी फोडल्याचा आरोप मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून स्वाभिमानवर करण्यात आला आहे. या बंदमध्ये रिक्षा चालक मात्र सामील झाले नाही.
टॅक्सी, रिक्षा न थांबल्यास कारवाइ
बरेचदा रिकामी टॅक्सी वा रिक्षा तुम्ही विनंती करूनही थांबत नाही. अशा उद्दाम टॅक्सी- रिक्षाचालकांवर कारवाई होणार आहे. भाडे नाकारणाऱ्याच्या टॅक्सी-रिक्षाचा मोबाइलवर फोटो काढा आणि परिवहन विभागाच्या अॅपवर पाठवा. परिवहन विभागाकडून काय कारवाई झाली ते तुम्हाला कळविले जाईल.
टॅक्सी-रिक्षांविरुद्ध धडक कारवाई
मुंबई, ठाणे, पुणे आणि पनवेलच्या परिवहन कार्यालयामार्फत टॅक्सी-रिक्षा तपासणीची धडक मोहीम १ ते १५ जूनदरम्यान राबविण्यात आली. त्यात १ हजार २७५ टॅक्सी व ३ हजार ७६० रिक्षा दोषी आढळल्या. अवैध प्रवासी वाहतूक, वैध प्रमाणपत्रे नसणे, वैध विमा, वैध पीव्हीसी नसणे, भाडे नाकारणे, नोंदणी रद्द झालेल्या वाहनांचा वापर या त्रुटी आढळल्याची माहिती परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी या पत्रपरिषदेत दिली.