हजारो घरकुले लाभापासून वंचित
By Admin | Updated: July 7, 2014 01:20 IST2014-07-07T01:20:55+5:302014-07-07T01:20:55+5:30
तालुक्याच्या दऱ्याखोऱ्यात, डोंगरकुशीत राहणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील हजारो आदिवासींना शासनाने इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर केली. या लाभार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करुन घरकुले पूर्ण केली

हजारो घरकुले लाभापासून वंचित
शौकत शेख, डहाणू
तालुक्याच्या दऱ्याखोऱ्यात, डोंगरकुशीत राहणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील हजारो आदिवासींना शासनाने इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर केली. या लाभार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करुन घरकुले पूर्ण केली. परंतु जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण झालेल्या घरकुलांचे अद्यापही मूल्यांकन न झाल्याने सुमारे चार हजार घरकूल लाभार्थी तिसऱ्या हप्त्या (अनुदान) पासून वंचित असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.
साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू आदिवासी मतदार संघात एकूण ८५ ग्रामपंचायती असून सत्तर टक्केपेक्षा अधिक आदिवासींची वस्ती आहे. त्याच्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडील बहुसंख्य ग्रामपंचायती श्ांभर टक्के आदिवासी लोकवस्तीच्या आहेत. येथील दारिद्र्य रेषेखालील आदिवासींना त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळावे म्हणून शासनाने २०१२-१३ या वर्षात इंदिरा आवास योजनेत ६,२३३ घरकुले मंजूर केली होती. तर २०१३-१४ च्या आर्थिक वर्षात ६,५८८ घरकुलाचे अनुदान मंजूर केले.
लाभार्थ्यांनी घरकूल पूर्ण केली तरी पंचायत समिती, डहाणू येथील जि. प. चे शाखा अभियंता मूल्यांकन करून दाखला देत नसल्याने तालुक्यात चार हजार घरकूलधारक तिसऱ्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. विशेष म्हणजे हजारो लाभार्थ्यांची घरकुले झाल्याचा अहवाल ग्रामसेवकांनी बांधकाम विभागाला दिला आहे, परंतु काही ना काही त्रुटी काढून शाखा अभियंता मूल्यांकन करण्यास चालढकल करीत असल्याचा आरोप आहे.
घरकूल लाभार्थ्यांचे मूल्यांकन त्वरित क रावे, या मागणीसाठी नुकतेच श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष लहांगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते तसेच घरकूल लाभार्थ्यांनी पंचायत समितीला घेराव घालून जाब विचारला होता, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पंचायत समिती येथे शिष्टमंडळ आणून मनमानी करणाऱ्या शाखा अभियंत्यावर कारवाईची मागणी केली होती.
डहाणूतील इंदिरा आवास घरकुलाबाबतीत अधिक चौकशी केली असता आदिवासी घरकूल लाभार्थ्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा उचलून तसेच ग्रामसेवकांवर दबाव टाकून काही राजकीय पक्षाचे पुढारी तसेच कार्यकर्ते घरकूल बांधण्याचा ठेका घेत आहेत, तर सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य अव्वाच्या सव्वा भाव घेऊन घरकुलाच्या साहित्याचा पुरवठा करत असत. या प्रकरणी घरकुलात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार पंचायत समिती डहाणूला करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डहाणूतील गेल्या दोन वर्षाच्या घरकुलाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.