गेल्या वर्षभरात हजारभर बालमजुरांची सुटका
By Admin | Updated: January 4, 2016 01:33 IST2016-01-04T01:33:09+5:302016-01-04T01:33:09+5:30
कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरी देऊन राबवून घेणाऱ्यांविरोधात समाजसेवा शाखेने केलेल्या धडक कारवाईत वर्षभरात तब्बल एक हजार नऊ बालमजुरांची सुटका करण्यात आली

गेल्या वर्षभरात हजारभर बालमजुरांची सुटका
मनीषा म्हात्रे, मुंबई
कोवळ्या हातांना अत्यल्प मजुरी देऊन राबवून घेणाऱ्यांविरोधात समाजसेवा शाखेने केलेल्या धडक कारवाईत वर्षभरात तब्बल एक हजार नऊ बालमजुरांची सुटका करण्यात आली. ६६७ मालकांवर कारवाई करण्यात आली असून, ५१४ गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हे सर्वाधिक प्रमाण आहे.
शहरात अंदाजे चार हजार बाजमजूर राबत आहेत. घरकाम, हॉटेल, गॅरेज, जरी, चामड्याचा व्यवसाय, प्लास्टिक मोल्डिंगसह विविध लघुउद्योगांमध्ये लहान मुलांना राबवून घेतले जाते. कमी मजुरीत त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. त्यामुळेच या उद्योगांमध्ये प्रौढांपेक्षा बालमजुरांसाठी मालक आग्रही असतात. या उद्योगांमध्ये धाडी घालून बालमजुरांची सुटका करत त्यांना पुन्हा पालकांच्या हवाली केले जाते. तथापि, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ही मुले पुन्हा तिथेच दिसतात.
अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त प्रवीण पाटील यांनी बालमजुरीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. मार्च २०१५ मध्ये या कायद्यात शासनाकडून सुधारणा करण्यात आली.
३७० (१) कलमाचा समावेश करण्यात आला. हे कलम अजामीनपात्र असून यामध्ये त्यांना किमान सात वर्षांची शिक्षा होणे आता शक्य आहे.
जामिनावर सुटण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी मालकांना किमान दोन ते तीन महिने पोलीस कोठडीत राहावे लागते. या बदलामुळे नववर्षात बालमजुरीवर आळा बसण्यास मदत होईल, असे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)