Join us  

महाविकास आघाडीत नाराज, कृष्णकुंजवर हजारो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 3:57 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजवर जाऊन

मुंबई - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेतील काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात खदखद आहे. वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय अनेकांना पचनी पडला नाही, त्यामुळे आता पर्याय कोणता असा प्रश्नही अनेकांसमोर उभा राहिला आहे. यातूनच, शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात प्रवेश केला आहे.  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशात, रायगडमधील पेण, मुरुड भागातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय विविध शहरं, तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनीही राज ठाकरेंशी मनसे नातं जोडलंय. 

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्येही राजी-नाराजी दिसून येत आहे. त्यामुळेच, राजीनामानाट्य पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम गावपातळीवरील राजकारणातही झाला आहे. स्थानिक नेत्यांची मनमानी, मान-सन्मान किंवा पद मिळत नाही, वरिष्ठ नेत्यांसमोर समस्या मांडूनही होणारं दुर्लक्ष, महाविकास आघाडीतील स्थानिक मतभेद यासह अनेक कारणांमुळे कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. दरम्यान, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. यावर प्रतिक्रिया देताना, राज ठाकरेंनीही हे सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी असल्याचं म्हटलं होतं. 

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक बदल होताना काही काळात दिसणार आहेत. येत्या 23 तारखेला मनसेचं मुंबईत पहिला महाधिवेशन भरणार आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षातील संघटनेत तसेच भूमिकेत बदल करणार असल्याची माहिती मिळत आहे. मराठी कार्डचा प्रभाव निवडणुकीच्या निकालात दिसत नसल्याने मनसे सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळणार असल्याचीही चर्चा आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेनामुंबई