Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष संपत आले तरी मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 06:51 IST

डिसेंबर ठरला यंदाच्या दशकातील सर्वाधिक उष्ण महिना

मुंबई : दरवर्षी गुलाबी थंडीची चादर ओढणाऱ्या डिसेंबर महिन्याने यंदा मुंबईकरांची घोर निराशा केली आहे. देशाची राजधानी असलेले दिल्ली शहर गारठले असताना मुंबईकरांना अद्याप थंडी जाणवलीही नाही. एवढेच नव्हे तर यंदा डिसेंबर हा गेल्या दशकातील सर्वात उष्ण महिना ठरला आहे.दिल्लीत नोंदवले गेलेले २.४ अंश सेल्सिअस तापमान हे हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. तर १९०१ नंतर डिसेंबरमधील दुसऱ्या क्रमांकाच्या नीचांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. मुंबईत मात्र किमान तापमान आतापर्यंत १८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेले नाही. २००९ पासून तापमानाचा आढावा घेतल्यास २०१९ चा डिसेंबर महिना उष्ण ठरला असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.राज्याचा विचार केल्यास राज्यात चंद्रपूरमध्ये सोमवारीही सर्वात कमी ५.७ अंश सेल्सिअस तापमान होते. तर गोंदियात ५.८ अंश सेल्सिअस तापमान होते. मुंबईत मात्र कमाल ३० ते किमान २० ते २२ अंश सेल्सिअस तापमान कायम राहिले. त्यामुळे मुंबईकरांना या वर्षी गुलाबी थंडीचा अनुभव घेता आला नाही. त्यामुळे वर्ष संपत आले तरी मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा कायम आहे.