‘त्या’ ज्येष्ठांना मिळणार पैसे परत
By Admin | Updated: October 27, 2014 00:36 IST2014-10-27T00:36:10+5:302014-10-27T00:36:10+5:30
ठाण्यातील ११० गुंतवणुकदारांनी दरमहा दोन टक्के व्याज मिळणार या हेतूने ठक्कर लक्ष्मीदास हरजीवनदास यांच्या योजनेमध्ये आयुष्यभराची कमाई गुंतविली होती.

‘त्या’ ज्येष्ठांना मिळणार पैसे परत
ठाणे : ठाण्यातील ११० गुंतवणुकदारांनी दरमहा दोन टक्के व्याज मिळणार या हेतूने ठक्कर लक्ष्मीदास हरजीवनदास यांच्या योजनेमध्ये आयुष्यभराची कमाई गुंतविली होती. परंतु या नागरीकांची घोर निराशा झाली. अखेर आता तब्बल १२ वर्षांनतर या नागरीकांना आपली गुंतविलेली रक्कम परत मिळणार आहे. त्यामुळे आता जेष्ठांचे दिवस सुखात जाणार असल्याचे चित्र आहे.
बाजारपेठ रस्त्यावरील ठक्कर लक्ष्मीदास हरजीवनदास या किराणा मालाच्या दुकानाचे ठाण्यात बरेच नाव आहे. या दुकानाच्या मालकाने याच नावाचा फायदा उठवत एक योजना जाहीर केली. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर दरमहा २ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवण्यात आले. आपण आफ्रिकेला औषध निर्यात करत असून त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. जर या योजनेत पैसे गुंतवले तर त्यातून चांगले उत्पन्न मिळेल असे आमिष दाखवत त्याने ज्येष्ठ नागरिकांना भुलवले. जे नागरिक निवृत्त होत आहेत किंवा निवृत्तीच्या वाटेवर आहेत अशांना त्यांनी आपल्या जाळ्यात ओढले. सुरूवातीला या गुंतवणूकीवर ज्येष्ठ नागरिकांना चांगले व्याज मिळाले. काहीवेळा तर ते अगदी घरपोच मिळाले. यातूनच या योजनेची हवा निर्माण झाली आणि निवृत्त झालेल्या अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेत आपले पैसे गुंतवले. कालांतराने या गुंतवणुकीतून मिळणारे व्याजही बंद झाले. शिवाय गुंतवलेली रक्कमही परत मिळेनाशी झाली. आपल्याला व्याजही मिळत नाही आणि गुंतवलेली रक्कमही परत मिळत नाही हे पाहून या गुंतवणुकदारांनी पोलीस आणि न्यायालयाची पायरी चढली. न्यायालयाने गुंतवणुकदाराचे पैसे परत देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने संबंधित संस्थेच्या मालमत्तेचा लिलाव करावा आणि त्यातून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे असे आदेश दिले. या आदेशानंतर मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्यातून साडेसात कोटी रूपये जमा झाले. (प्रतिनिधी)