Join us  

लोकल प्रवाशांना सर्वात मोठा दिलासा! पासाच्या त्रासातून अखेर सुटका; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 11:35 AM

मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; प्रवासासाठी आता पासची गरज नाही

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. लसीकरण पूर्ण होऊन १५ दिवस पूर्ण झालेल्यांना आता लोकलचं तिकीट मिळणार आहे. लसीकरण पूर्ण झालेल्यांना केवळ मासिक पास देण्याचा निर्णय याआधी राज्य सरकारनं घेतला होता. त्यामुळे काही दिवस खूप गोंधळ पाहायला मिळाला. काही तासांचा प्रवास करण्यासाठी लोकांना पास खरेदी करावा लागत असल्यानं मोठी नाराजी होती. त्यामुळे अखेर आधीप्रमाणेच तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फायदा लाखो प्रवाशांना होणार आहे.

राज्य सरकारनं लोकलची तिकीट विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. या निर्णयाविरोधात संतापा पाहायला मिळाला होता. रेल्वेनं ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर राज्य सरकारनं रेल्वे प्रशासनाला एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अशा सर्वच प्रवाशांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली आहे. 

रेल्वेनं अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावेत, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची पडताळणी करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अशा सूचनाही राज्य सरकारनं पत्रातून केल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दोन लस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि त्याला १४ दिवस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवासासाठी पास मिळायचा. यामुळे नियमित प्रवास न करणाऱ्या प्रवाशांनादेखील पास घ्यावा लागला. त्यामुळे त्यांच्या खिशाला नाहक फटका बसू लागला. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना होती. ही बाब लक्षात घेऊन अखेर तिकीट विक्री सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. 

टॅग्स :मुंबई लोकलरेल्वे