Join us  

‘त्या’ प्रदेशाध्यक्षांनी आपले राजीनामे द्यावेत- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 5:55 AM

पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नवीन टीम बनविण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली नाही तेथील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना नवीन टीम बनविण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाला राहुल गांधी हे जबाबदार नाहीत आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचे काहीही कारण नाही, असे सांगून चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी कठोर परिश्रम घेतले. ते कुठेही कमी पडलेले नाहीत.महाराष्ट्रातील पराभवावर बोलताना चव्हाण म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष या नात्याने या पराभवाची सर्व जबाबदारी मी घेत आहे. त्याबद्दल कोणालाही दोष देत नाही. पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यास मी तयार आहे. राज्यातील काँग्रेस पक्षात कसलेही अंतर्गत मतभेद नाहीत. आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतलेले आहेत.पक्षविरोधी काम केलेल्यांवर कारवाई केली जाईल. जिल्हा काँग्रेसकडून अहवाल मागितले जातील, असे त्यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले.>वंचित आघाडीचा १० जागांवर परिणाम :वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आघाडीच्या ९ ते १० जागांवर परिणाम झाला.त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला पण ते आले नाहीत, त्याचा आम्हाला फटका बसला. वंचितने भाजपची बी टीम म्हणूनच काम केले. या आघाडीचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला, असा दावा चव्हाण यांनी केला. लोकसभा निवडणुकीत जे चित्र समोर आले ते चार महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. काँग्रेस पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :अशोक चव्हाण