दिघ्यातील ‘त्या’ इमारती अखेर जमीनदोस्त
By Admin | Updated: October 6, 2015 00:58 IST2015-10-06T00:58:39+5:302015-10-06T00:58:39+5:30
दिघा परिसरातील बेकायदा इमारतींवर एमआयडीसीने सोमवारी पुन्हा कारवाई केली. याअंतर्गत दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईला विरोध करणाऱ्या सुमारे ७५

दिघ्यातील ‘त्या’ इमारती अखेर जमीनदोस्त
नवी मुंबई : दिघा परिसरातील बेकायदा इमारतींवर एमआयडीसीने सोमवारी पुन्हा कारवाई केली. याअंतर्गत दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईला विरोध करणाऱ्या सुमारे ७५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर अनेकांना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दिवसभर दिघा परिसरात तणावाचे वातावरण होते.
एमआयडीसीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिघा परिसरातील ९९ अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत सोमवारी या विभागातील शिवराम अपार्टमेंट आणि पार्वती निवास या अनुक्रमे पाच आणि तीन मजली अशा दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आला. या दोन्ही इमारतीत जवळपास ५0 कुटुंबे वास्तव्याला होते. परंतु एमआयडीसीच्या आवाहनानंतर त्यांनी यापूर्वीच आपली घरे रिकामी केली होती. असे असले तरी सकाळी कारवाईसाठी आलेल्या एमआयडीसीच्या पथकाला रहिवाशांनी प्रखर विरोध दर्शविला. महिलांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तर शालेय विद्यार्थ्यांनाही आंदोलनात उतरविले गेल्याने तणाव निर्माण झाला होता. परंतु विद्यार्थ्यांना आंदोलनात उतरविल्याप्रकरणी मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत पोलिसांनी दिले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत पाठविण्यात आले. रहिवासी अधिक आक्रमक बनल्याने दुपारी तीन वाजल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली. यात सुमारे ७५ आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात महिलांचे प्रमाण मोठे आहे.
पोलिसांच्या कारवाईनंतर नेतृत्वाअभावी आंदोलन करणाऱ्या रहिवाशांत पांगापांग झाली. त्यानंतर एमआयडीसीने शिवराम अपार्टमेंट व पार्वती निवास या दोन इमारती बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्या. कारवाईत तीनपैकी दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली. उर्वरित केरू प्लाझा इमारतीवर मंगळवारी पुन्हा कारवाई करण्यात येणार असल्याचे एमआयडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवराम अपार्टमेंट आणि पार्वती सदन या दोन इमारतीवरील कारवाईमुळे जवळपास पन्नास कुटुंबे बेघर झाली आहे. (प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांना नोटिसा
कारवाईला विरोध करणाऱ्या पंचवीस जणांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. यात समाजसेविका ऋता आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे. माजी महापौर सागर नाईक यांनी मात्र नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांबरोबरच चर्चा
दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर एमआयडीसीकडून सुरू असलेल्या कारवाईसंदर्भात सकारात्मक तोडगा काढावा यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी उपस्थित होते. न्यायालयाचा अवमान होणार नाही, या दृष्टीने या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.
संतप्त रहिवाशांचा रास्ता रोको
एमआयडीसीच्या कारवाईच्या निषेधार्थ दिघ्यातील संतप्त रहिवाशांनी ठाणे-बेलापूर मार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी दगडफेक केल्याने यात काही वाहनांचे नुकसान झाले. तसेच संतप्त जमावाने दिघा येथे रेल्वे मार्ग अडविण्याचा प्रयत्न केल्याने ठाणे-वाशी मार्गावरील लोकल वीस मिनिटे विस्कळीत झाली होते.
महिलांचा आक्रोश
संतप्त महिलांनी एमआयडीसी व लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणा दिल्या. एका महिलेने डोके जमिनीवर आपटून संताप व्यक्त केला. पोलिसांनी महिलेला जखमी अवस्थेतच ताब्यात घेवून संध्याकाळी सोडून दिले.