लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वरळी- शिवडी उन्नत मार्गिका प्रकल्पात बाधित होणाऱ्या प्रभादेवी रेल्वेस्थानकाजवळील दोन इमारतींतील रहिवाशांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांबरोबर रहिवाशांची बुधवारी बैठक पार पडली. यात प्रकल्पबाधित सदनिकांऐवजी आर्थिक मोबदल्याचा पर्याय एमएमआरडीएने दिला आहे. त्यामध्ये प्रकल्पबाधितांना ३० लाख ते १ कोटी १० लाख रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
वरळी- शिवडी उन्नत मार्गिका प्रकल्पाच्या आराखड्यानुसार रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूला १९ इमारती तोडाव्या लागणार होत्या. यातील बहुतांश इमारती खासगी मालकीच्या आहेत. त्यांच्यासाठी मोठा मोबदला द्यावा लागणार असल्याने हा प्रकल्पच अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यामुळे एमएमआरडीएने प्रभादेवी रेल्वेमार्गावरील पुलाच्या आराखड्यात बदल केला आहे.
रहिवाशांनी नोंदवले आक्षेपनव्या आराखड्यानुसार या प्रकल्पात २ इमारती बाधित होत आहेत. हाजी नुरानी चाळीतील २३ आणि लक्ष्मी निवासमधील ६० रहिवासी बाधित होणार आहेत. एमएमआरडीएतील अपर जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे यांनी बुधवारी रहिवाशांबरोबर त्यांच्या दालनात बैठक घेतली. यात सदनिकांऐवजी आर्थिक मोबदल्याच्या पर्यायाबाबत चर्चा केली. मात्र, बैठकीत आम्ही काही आक्षेप नोंदविले आहेत. आता ते लिखित स्वरूपात पुढील बैठकीत मांडले जाणार आहेत. त्यानंतर एमएमआरडीएकडून त्यावर निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती रहिवाशांनी दिली.