‘त्या’ १८ बसेसचे टायर बदलणार
By Admin | Updated: June 18, 2015 00:41 IST2015-06-18T00:41:00+5:302015-06-18T00:41:00+5:30
येथील बाजीप्रभू चौकातील कल्याण-डोंबिवली परिवहनच्या वाहनतळावर मंगळवारी ६ बसमध्ये पंक्चरसह तांत्रिक बिघाडाची समस्या उद्भवली होती.

‘त्या’ १८ बसेसचे टायर बदलणार
डोंबिवली : येथील बाजीप्रभू चौकातील कल्याण-डोंबिवली परिवहनच्या वाहनतळावर मंगळवारी ६ बसमध्ये पंक्चरसह तांत्रिक बिघाडाची समस्या उद्भवली होती. त्या बस क्रमांकांसह त्यांच्या रद्द झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रसिद्ध केले. त्याची दखल घेऊन परिवहन सदस्यांनी आगार अधिकाऱ्यावर तोफ डागली. तसेच आगामी काळात अशा पद्धतीने बस रस्त्यावर आल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला.
पावसाळयाच्या दिवसात पंक्चरसह टायरमध्ये बिघाड असलेल्या बस रस्त्यावर उतरवण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. ज्या १८ बसच्या टायरची क्षमता संपुष्टात आली आहे ती तातडीने बदलण्यात येणार असल्याची माहिती परिवहन समितीचे सदस्य दीपक भोसले यांनी लोकमतला दिली.
या वृत्तामुळे डोंबिवलीकर प्रवाशांना झालेला त्रास समोर आला असून हे चांगले नाही. अशा पद्धतीने काणाडोळा करुन जनतेचे हाल का केले जातात, असा सवालही त्यांनी केला. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने पावसाळ्याच्या पहिल्या १५ दिवसात अशा समस्या उद्भवतातच असे उत्तर देऊन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. त्यावर अशी मानसिकता असेल तर, आगामी काळात समस्या आल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा
इशाराही त्यांनी दिला.
(प्रतिनिधी)