‘त्या’ १३७ मंडळांनी दंड भरलाच नाही
By Admin | Updated: October 10, 2015 00:11 IST2015-10-10T00:11:48+5:302015-10-10T00:11:48+5:30
गणेशोत्सव काळात विनापरवाना, विनाअर्ज मंडप उभारणे, दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित न करणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आदी

‘त्या’ १३७ मंडळांनी दंड भरलाच नाही
ठाणे : गणेशोत्सव काळात विनापरवाना, विनाअर्ज मंडप उभारणे, दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित न करणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आदी कारणास्तव ठाण्यातील जवळपास १३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी १ लाख रु पये दंडाच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या होत्या. या दंडाची रक्कम ४८ तासांत भरावी, असे आदेशही आयुक्तांनी दिले होते. परंतु, एक आठवडा उलटूनही एकाही मंडळाने हा दंड भरला नसल्याचे उघड झाले आहे. आता यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पालिकेने चेंडू टोलवला असून त्यांना याची माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.
महापालिका हद्दीत गणेशोत्सवाच्या काळात नियमांना बगल देऊन मंडप उभारणाऱ्या १३७ गणेशोत्सव मंडळांना तुर्भे (नवी मुंबई) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास उच्च न्यायालयाने केलेल्या दंडाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने नोटिसा बजावून ४८ तासांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये भरण्याचे निर्देश दिले होते. तसेच त्याची पावती पालिकेकडे जमा करावी, अशा सूचनाही दिल्या होत्या. मागील महिन्यात ३० सप्टेंबर रोजी आयुक्तांनी असे आदेश दिले होते. त्यानंतर, या मंडळांना मंगळवारी सायंकाळपर्यंतची मुदतवाढही दिली होती. परंतु, आता शुक्रवार उजाडला तरीदेखील अद्यापपर्यंत एकाही मंडळाने दंडाची रक्कम भरली नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सध्या पालिकेचा स्टाफ हा अतिक्रमणविरोधी कारवाईत असल्याने ही वसुली होऊ शकली नसल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
आता धुरा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे
दुसरीकडे आता महसूल वसुली प्रमाणपत्राच्या प्रक्रियेनुसार याची वसुली करण्यासाठी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती देण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार, पुढील कारवाई त्यांच्याकडून होईल, असेही सांगितले असून या प्रकरणातूनच हात वर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता दंडाची वसुली होणार की नाही, याबाबत मात्र शंका निर्माण झाली आहे.