Join us

यंदा दीड लाख गोविंदांना मिळणार शासकीय विम्याचे कवच : भरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 09:14 IST

भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी सभागृहात यासंदर्भात मागणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने दहीहंडी सणाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यामुळे अनेक गोविंदांचा सहभाग वाढला आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ७५ हजार गोविंदांना विमा कवच देण्यात येत होते. त्यात वाढ करून या वर्षांपासून दीड लाख गोविंदांना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत तर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत शुक्रवारी दिली.

भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी सभागृहात यासंदर्भात मागणी केली होती. महाराष्ट्रातील गोविंदांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी न्यायालयीन लढाई लढली. त्यामुळे हा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दहिकाला उत्सवात अनेक गोविंदा पडून जखमी होतात. श्रीकृष्ण पडेलकर समितीने सर्वंकष अभ्यास करून दीड लाख विमा कवच देण्याच्या मागणीचा शासन विचार करणार का? असा प्रश्न दरेकर यांनी केला.

त्यावर मंत्री शेलार यांनी गेल्या वर्षी सव्वालाख गोविंदांना विमा कवच दिले होते. यंदाही राज्यातील दीड लाख गोविंदांना सुरक्षा कवच देऊन विमा व प्रीमियम सरकार भरेल, असे सांगितले. तर क्रीडामंत्री भरणे यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यासाठी अंदाजे १ कोटी २५ लाख इतका निधी राज्य क्रीडा विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून मनोरे रचताना तरुणांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.

टॅग्स :दहीहंडी